SPPU Pudhari
पुणे

Pune University Language Bhavan Result: पुणे विद्यापीठातील भाषा भवनाचा निकाल १०० दिवसांपासून रखडला; ३०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

प्रथम वर्ष मराठी-इंग्रजी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर नाही; १४ सप्टेंबरपासून आंदोलनाचा विद्यार्थ्यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील प्रथम वर्ष मराठी आणि इंग्रजी विषयांच्या परीक्षा मे महिन्यात झाल्या. परीक्षा होऊन १०० दिवसांहून अधिक कालावधी लोटला, तरी अद्यापही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. नियमानुसार ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. या विलंबाचा थेट फटका ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना बसला असून, त्यांनी येत्या १४ सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश घेता आलेला नाही. परिणामी, कमवा व शिका योजना (कर्मवीर भाऊराव पाटील योजना), विविध शिष्यवृत्ती योजना, ग्रंथालय, वाचनालय, इंटरनेट व इतर शैक्षणिक सुविधांचा लाभ त्यांना मिळत नाही. भाषा भवनातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, दलित, ओबीसी, आदिवासी व बहुजन समाजातून येणारे आहेत.

शिक्षण सुरू ठेवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आधारव्यवस्था आहे. परंतु, निकाल रखडल्यामुळे ते या योजनेपासूनही वंचित राहिले आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे भाषा भवनातील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तत्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, दि. १४ सप्टेंबरला आंदोलन करण्यात येणार असल्याचे संबंधित विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.

जानेवारी २०२७ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तसेच २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातच भाषा विषयांच्या विद्यार्थ्यांचे निकाल १०० दिवसांहून अधिक काळ प्रलंबित राहणे अत्यंत दुर्दैवी आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या दिरंगाईमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ निकाल जाहीर करावा.
अभिषेक शेलकर, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
मे २०२६ मध्ये प्रथम वर्ष (द्वितीय सत्र) परीक्षा दिल्यानंतरही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. निकाल प्रलंबित असल्यामुळे द्वितीय वर्षातील अनेक शैक्षणिक सुविधा, ग्रंथालय व वाचनालयाचा नियमित लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निकाल तातडीने जाहीर होणे आवश्यक आहे.
साक्षी बनसोडे, विद्यार्थिनी, मराठी विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT