पुणे: मागील वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्यू.एस. रँकिंग ६४०वरून ५६६ पर्यंत सुधारले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या वाटचालीबाबत कौतुक केले होते. परंतु, यावर्षी विद्यापीठाचे रँकिंग चांगलेच घसरले असून, विद्यापीठ ७९१-८०० दरम्यानच्या गटात फेकले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जगभरातील विद्यापीठांचे क्यू. एस. टॉप युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतेच प्रसिद्ध केले आहे. क्यू. एस. रँकिंगमध्ये संशोधनाला अधिक प्राधान्य दिले जाते. विद्यापीठात वर्षभरात निवृत्त झालेल्या प्राध्यापकांची संख्या मोठी आहे. या प्राध्यापकांकडून प्रसिद्ध केले जाणारे रिसर्च पेपर आता रँकिंगसाठी उपलब्ध होत नाहीत. त्याचाही फटका विद्यापीठाच्या रँकिंगला बसला आहे.
विद्यापीठात प्राध्यापकांची संख्या कमी आहे. त्याचबरोबर विद्यापीठातर्फे उपलब्ध करून दिलेल्या अनेक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. रँकिंगसाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे प्रमाण देताना अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या कमी विद्यार्थ्यांचा फटका रँकिंगला बसतो. त्याचप्रमाणे सध्या पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. एमेरिटस प्रोफेसर आणि प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससारखे पर्याय विद्यापीठाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे प्राध्यापकांची संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाने या पर्यायाचा अवलंब करायला हवा होता.
परंतु, त्यावरही विद्यापीठाने केवळ चिंतन करण्यापलीकडे काहीही केले नाही. क्यू.एस. रँकिंगमध्ये यंदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली ११८ क्रमांकावर असून, आयआयटी बॉम्बे १३४ व्या क्रमांकावर, आयआयटी मद्रास १७० व्या क्रमांकावर, २०५ व्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर २२१ व्या क्रमांकावर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर २२१ व्या क्रमांकावर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ३३५ व्या क्रमांकावर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ३४९ व्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एक वर्षात विद्यापीठाचे रँकिंग सुमारे २५०ने घसरले हे धक्कादायक आहे. प्रशासकीय नेतृत्व करणाऱ्यांचे हे अपयश आहे. गेली दोन वर्षे मी आणि अनेक लोकनियुक्त सदस्य विद्यापीठाचे कामकाज सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करतोय. अनेक विषयांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. पण विद्यापीठात सुधारणा करण्याऐवजी आम्हालाच “लक्ष्य” केले गेले आहे. विद्यापीठातील सद्य:स्थिती गंभीर असून, राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा स्पर्धात्मक युगात देदीप्यमान परंपरा असलेल्या पुणे विद्यापीठाचे भवितव्य संकटात आहेसागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ