SPPU Pudhari
पुणे

Pune University Engineering Admission: अभियांत्रिकी प्रवेशात पुणे विद्यापीठाचा डंका; राज्यात सर्वाधिक ५३,९७३ विद्यार्थ्यांचा प्रवेश

सीईटीच्या चार फेऱ्यांत १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अभियांत्रिकी प्रवेशात राज्यात सर्वाधिक ५३ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याखालोखाल ३० हजार ९०९ विद्यार्थ्यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, तर २५ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच, १४ हजार २४ विद्यार्थ्यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व ८ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशात पुणे विद्यापीठाचा डंका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱ्या राबविल्या गेल्या. या फेऱ्यांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या २ लाख ३ हजार २९३ उपलब्ध जागेपैकी १ लाख ५२ हजार ४५२ म्हणजे ७४.९९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी राज्यात ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयात १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून, यामध्ये २ लाख १८ हजार ९७६ जागा (व्यवस्थापन कोट्यासह) उपलब्ध आहेत. यापैकी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियामध्ये २ लाख ३ हजार २९३ जागा उपलब्ध होत्या, चौथ्या फेरीअखेर ७४.९९ टक्के म्हणजे १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या १११ विषयांच्या शाखेमध्ये प्रवेश घेतले. यातील संगणक अभियांत्रिकी या शाखेमध्ये सर्वाधिक २३ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

संस्थात्मक फेरीसाठी ५० हजार ८४१ जागा उपलब्ध

सीईटी कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून सध्या संस्थात्मक फेरी व व्यवस्थापन फेरीचे प्रवेश सुरू आहेत. हे सर्व प्रवेश १४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. संस्थात्मक फेरीसाठी कॅपमधून शिल्लक राहिलेल्या ५० हजार ८४१ जागा उपलब्ध आहेत. तर व्यवस्थापन कोट्यात १५ हजार ६८३ जागा उपलब्ध आहेत.

कॅपमध्ये झालेले विषयानुसार प्रवेश (पहिले दहा)

  • कॉम्प्युटर इंजिनियरिंग - २३,२३०

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग- १६,९१८

  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग - १५,९७१

  • कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग - १५,७८७

  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी - १२,४९४

  • सिव्हील इंजिनियरिंग - १२,०९५

  • इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग - १०,१९२

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स - ८,८१६

  • कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) - ५,४८०

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ३,९३६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT