

पुणे: डोक्यावर रत्नजडीत मुकुट... कानात नक्षीदार भीकबाळी... सोंडेवर आकर्षक सोंडपट्टी... गळ्यात चांदीच्या दुर्वा, जास्वंद अन् मोत्यांचा हार... हातात कडे-बाजूबंद आणि चरणांशी चांदीचे मोदक, मूषक, कमळ अन् पान-सुपारी! यंदा लाडक्या गणरायाला असा राजेशाही साज चढविण्यासाठी पुण्याच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या आकर्षक आभूषणांची रेलचेल सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या सजावटीसाठी विशेषतः चांदीच्या दुर्वा, मोदक, हार, त्रिशूळ आणि कमळाच्या खरेदीकडे भक्तांचा कल वाढला आहे.
चांदीच्या दुर्वांना सर्वाधिक पसंती
पारंपरिक आभूषणांबरोबरच बदलत्या आवडीनुसार कारागिरांनी वेगवेगळ्या आकार आणि नक्षीतील आभूषणे तयार केली आहेत. रत्नजडीत मुकुट, तोडे, जानवे, मूषक, दुर्वाहार, कडे, बाजूबंद, पान-सुपारी, जास्वंदीचा हार, मोत्यांचा हार, त्रिशूळ, सोंडपट्टी, शेला, भीकबाळी, छत्री आणि उपरणे अशा विविध प्रकारच्या सोन्या-चांदीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
याखेरीज रंगीबेरंगी फुले, केवड्याची फुले आणि फळांची परडीही चांदीमध्ये साकारण्यात आली आहे. त्यामुळे केवळ गणरायाला दागिने घालण्यापुरती खरेदी मर्यादित न राहता पूजेतील विविध वस्तूही चांदीमध्ये घेण्याकडे भक्तांचा कल दिसत आहे. त्यामध्ये चांदीच्या दुर्वांना सर्वाधिक पसंती आहे. १७५ रुपयांपासून अलंकार उपलब्ध असून, उर्वरित दागिने वजन आणि किमतीनुसार उपलब्ध आहे.
घरगुती गणपतींसोबत सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पासाठीही चांदीचे अलंकार खरेदी केले जात आहेत. मंदिरांमध्ये देणगीच्या स्वरूपात सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करण्याची परंपरा असल्याने चांदीचे मोदक, दुर्वा, हार आणि अन्य धार्मिक वस्तूंनाही मागणी आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीचे आभूषण तुलनेने परवडणारे असल्याने त्याला अधिक पसंती मिळत आहे. त्याचबरोबर कमी खर्चात सोन्याच्या दागिन्यांसारखा आकर्षक साज मिळत असल्याने सोन्याच्या फॉर्मिंग दागिन्यांकडेही भक्तांचा कल असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी खास तयार केलेल्या चांदीच्या आभूषणांमध्ये यंदा मोठे वैविध्य आहे. मुकुट, मोदक, हार, त्रिशूळ, कमळ यांची खरेदी होत असली, तरी चांदीच्या दुर्वांना सर्वाधिक मागणी आहे. घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक मंडळांसाठीही आभूषणांची विचारणा होत आहे. गणेशोत्सव जवळ येईल तशी खरेदी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
मयूर देवकर, संचालक, देवकर ज्वेलर्स.
पूर्वी गणरायासाठी मुकुट किंवा हार अशा मोजक्या वस्तूंची खरेदी होत असे. आता मोदक, दुर्वा, मूषक, पान-सुपारी, जास्वंदीची फुले, कमळ, फळांची परडी अशा अनेक वस्तू चांदीमध्ये मागितल्या जात आहेत. स्वतःच्या घरातील गणपतीसह सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाला चांदीचे अलंकार भेट देण्याकडेही नागरिकांचा कल वाढत आहे.
ऋषभ चिंचणकर, सराफा व्यावसायिक, नक्षत्र ज्वेलर्स