Pune University Double Decker Flyover Pudhari
पुणे

Pune University Double Decker Flyover: पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; औंध-बाणेर-शिवाजीनगर वाहतुकीला मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून, शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (दि.8) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते. मात्र, सर्वांना विश्वासात घेऊन आणि विविध पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळवून हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजितदादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारासमोर व गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारला आहे.

या उड्डाणपुलाची रचना एकात्मिक स्वरूपाची असून, वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औंध व बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प, शिवाजीनगरकडून बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल, सेनापती बापट रोडशी जोडणी, तसेच अंडरपास यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकारात्मक निर्णय

पुणे विद्यापीठासमोरील या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत व्यक्त झालेल्या भावना मान्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाबद्दल

  • उड्डाणपुलाची एकूण लांबी (रॅम्पसह) 1763.52 मीटर आहे.

  • प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता किंमत 277 कोटी रुपये आहे.

  • औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना जोडणारी रॅम्प वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे, याचा वाहनचालकांना मोठा फायदा होईल.

  • वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 55 मीटर लांबीचा स्टील गर्डर बसविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT