Water Tank Pudhari
पुणे

Pune Water Supply Problem: उंड्री-मोहम्मदवाडीत पाण्याचा तीव्र तुटवडा; 8.5 लाख नागरिक टँकरवर अवलंबून

40 एमएलडी टाक्या 7 वर्षांपासून कोरड्या; पाइपलाइन रखडल्याने नागरिकांचा संताप, टँकर खर्चाने कंबरडे मोडले

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: महंमदवाडी-उंड्री आणि कोंढवा परिसरातील सुमारे साडेआठ लाख नागरिकांना अद्यापही महापालिकेच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. या भागांत आजही नागरिकांना महापालिकेकडून एक थेंबही पाणी मिळत नसल्याची गंभीर स्थिती आहे. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या 40 एमएलडी (चार कोटी लीटर) क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या पूर्ण होऊनही गेल्या सात वर्षांपासून त्या कोरड्याच पडून आहेत.

या भागाचा महापालिकेत समावेश होऊन तब्बल 15 वर्षे उलटली असतानाही नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव नाराजी असून, त्यांनी वारंवार निवेदने देत आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, दोन ठिकाणी प्रत्येकी सुमारे 300 मीटर पाइपलाइनचे काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आठही पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पोहोचू शकते. याशिवाय, कात्रज-कोंढवा रस्त्यावर 125 मीटर जागेचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित ठिकाणी बांधकाम आणि जागेच्या ताब्याच्या अडचणींमुळे भूमिगत पाइपलाइन टाकण्यास अडथळे येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काही नागरिकांनी या विलंबामागे टँकर माफियांचा हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यास टँकर व्यवसायावर परिणाम होईल, या भीतीने पाइपलाइन कामात अप्रत्यक्ष अडथळे आणले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही सोसायट्यांवर खासगी टँकरचे पाणी घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

खासगी टँकरवर होतोय वारेमाप खर्च

शहराच्या वाढत्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामांना परवानगी देताना विकसकांनी पाणीपुरवठ्याची हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात ती पूर्ण न झाल्याने रहिवाशांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महंमदवाडी-उंड्री भागात टाक्या उभ्या असल्या, तरी त्या कोरड्या असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

रिकाम्या टाक्यांचा गैरवापर

पाण्याचा पुरवठा नसल्याने रिकाम्या टाक्यांचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी तरुणांकडून सेल्फी, व्हिडिओ शूटिंग, तसेच अशोभनीय कृत्ये केल्याच्या घटना घडत आहेत. टाक्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने धोका वाढला आहे.

टँकरवर अवलंबित्व आणि आर्थिक भार

या परिसरातील बहुतांश सोसायट्या खासगी टँकरवर अवलंबून आहेत. दररोज सुमारे 700 ते 800 टँकर पाणी आणले जाते. वाढत्या खर्चामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत असून, मागील अडीच वर्षांत पाणी खरेदीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

आंदोलने, आश्वासने आणि ‌‘जैसे थे‌’ स्थिती

काही दिवसांपूर्वी या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी ‌‘हंडा मोर्चा‌’ काढण्यात आला होता. त्या वेळी नवल किशोर राम यांनी परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

महंमदवाडी-उंड्री भागात पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत, पण त्या आजही कोरड्या आहेत. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलन व निवेदने दिली. अधिकाऱ्यांची भेट घेऊनही केवळ आश्वासने मिळाली. आता लवकरच आयुक्तांची पुन्हा भेट घेऊन रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
निवृत्ती बांदल, नगरसेवक
पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या सुमारे 600 मीटर पाइपलाइनचे काम प्रलंबित असून, ते दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. काही भागांत पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी उर्वरित नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल.
नंदकुमार जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT