प्रसाद जगताप
पुणे: गेल्या सहा वर्षांत पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरात ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 1 लाख 73 हजार 493 वाहनचालकांवर दणकेबाज कारवाई केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा (दि.17 डिसेंबरपर्यंत) सर्वाधिक 67 हजार 446 ट्रिपल सीट रायडिंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाने नुकतीच याबाबतची आकडेवारी जाहीर केली. त्यात ही माहिती समोर आली आहे. रस्त्यावरील बेशिस्त ट्रिपल सीट दुचाकी वाहतूक आणि जीवघेण्या स्टंटबाजीला लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी यापुढेही कंबर कसली आहे.
बेशिस्तपणे ट्रिपल सीट बसवून रायडिंग करत तरुणाई जीवघेण्या अपघातांना आमंत्रण देत आहे. याशिवाय इतर वाहनचालकांनाही याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे ट्रिपल सीट वाहनधारकांवरील कारवाई आगामी काळात अधिक तीव करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
कारवाई करून फक्त दंड वसूल करणे हा उद्देश नसून, नागरिकांचा जीव वाचवणे, हा मुख्य हेतू आहे. ट्रिपल सीट दुचाकी चालवणे फक्त बेकायदेशीरच नाही, तर ते अत्यंत धोकादायक आहे. अचानक बेक लावल्यास किंवा वळण घेताना गाडीचा ताबा सुटून भीषण अपघात होऊ शकतात. सन 2025 मध्ये आम्ही सीसीटीव्ही आणि ऑन-फिल्ड कारवाईवर अधिक भर दिला. यामुळे ही कारवाईची मोठी आकडेवारी समोर आली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील.हिंम्मत जाधव, पोलिस उपायुक्त
मोटार वाहन कायद्यातील वाहतूक नियमांनुसार दुचाकीवर दोन व्यक्तींना बसण्याची परवानगी आहे. मात्र, तरुणाई आणि शॉर्टकट शोधणारे काही नागरिक सर्रास ट्रिपल सीट प्रवास करताना दिसतात. अशा प्रवासात गाडीचा समतोल बिघडून गंभीर अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. काही तरुण तर क्रेझ म्हणून महाविद्यालयात ये-जा करताना दिसते. ही क्रेझ अपघातांना निमंत्रण देत असून, तरुणाईने बेजबाबदारपणे न वागता वाहतूक नियमांचे पालन करावे आणि इतर वाहनचालकांना त्रास होईल, असे वर्तन टाळावे.आनंद गायकवाड, वाहनचालक