

महेंद्र कांबळे
पुणे: पुण्यातील एका नामांकित शाळेत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने थेट आपल्या शिक्षिकेला प्रेमप्रस्ताव दिला, ‘आय लव्ह यू’ असे संदेश पाठवत अश्लील चॅटिंग केले, हातावर ब्लेडने शिक्षिकेचे नाव कोरले आणि प्रेम स्वीकारले नाही तर शाळेच्या सातव्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शाळेतील वातावरण तणावपूर्ण बनले असताना, वेळेवर समुपदेशन केल्याने मोठा अनर्थ टळला.
शिक्षिकेच्या मोबाईलवर सातत्याने हृदयाच्या इमोजींसह संदेश येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ‘तुम्ही मला खूप आवडता, तुम्ही दुसऱ्यांशी बोललेले मला चालत नाही, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही,’ अशा आशयाचे संदेश पाठवत विद्यार्थिनीने मानसिक दबाव निर्माण केला होता. समजावून सांगूनही ती ऐकत नसल्याने, शिक्षिकेने अखेर शाळा प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर हातावर शिक्षिकेचे नाव कोरल्याचे आणि आत्महत्येची धमकी दिल्याचे समोर आले.
या प्रकाराची तीवता वाढत असतानाच, काही दिवसांपूर्वी संबंधित विद्यार्थिनीने तिच्याच वर्गातील एका मुलीला वॉशरूममध्ये गाठून ‘तू खूप सुंदर दिसतेस, तुला बॉयफेंड आहे का?’ अशी विचारणा केली. घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीने तत्काळ उपमुख्याध्यापिकांकडे तक्रार केली. नववीतील चार ते पाच मुलींनाही तिने ‘आय लव्ह यू’चे संदेश पाठवले होते आणि त्यांच्या हातात अंगठी घालण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत समोर आले. विशेष म्हणजे वर्गात न बसता शाळेत फिरणे आणि शिक्षिकेकडे एकटक पाहणे हे तिचे रोजचेच झाले होते.
घडामोडी गंभीर होत असल्याचे लक्षात येताच, शिक्षकांनी दामिनी मार्शलशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने शाळेत भेट दिली. पोलिसी कारवाईऐवजी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समुपदेशनाचा मार्ग निवडत, विद्यार्थिनीला शांतपणे विश्वासात घेऊन तिचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वभावदोष, भावनिक गुंतागुंत अशा समस्या पाहायला मिळतात. त्यामुळे वयाचा विचार न करता प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते. वाईट काय, चांगले काय याबाबत निर्णय घेता येत नाही. किशोरवयीन मुला-मुलींच्या वर्तनामागे कौटुंबिक पार्श्वभूमी, नैराश्य, भावनिक त्रास आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. काही त्रास असल्यास मदतीचा हात देणे आवश्यक असते. यासाठी संवादाचा, समुपदेशनाचा उपयोग होऊ शकतो.
डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ
विद्यार्थिनीने चौकशीत कबूल केले की, वयात येताना शरीरातील हार्मोन्समध्ये होत असलेल्या बदलांमुळे आणि इंटरनेटवर पाहिलेल्या गोष्टींमुळे तिच्या मनात अशा भावना निर्माण होत होत्या. आकर्षण आणि प्रेमातील फरक न समजल्याने तिचे वर्तन धोकादायक वळण घेत होते. दामिनी मार्शलने व शिक्षकांनी तिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग, मन शांत ठेवण्याच्या पद्धती, इंटरनेटपासून योग्य अंतर ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगितले. पालकांनाही बोलावून परिस्थितीची गंभीरता पटवून देण्यात आली. तात्पुरते शाळेत नियमित येणे थांबवून परीक्षेला बसण्याची संधी देण्याचा मध्यम मार्ग काढण्यात आला. अभ्यास, खेळ आणि सकारात्मक उपक्रमांकडे ऊर्जा वळवण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी नेण्याची शिफारस करण्यात आली.
संबंधित मुलीची सायक्रोमेट्रीक चाचणी करणे गरजेचे आहे. यानंतर काही केमिकल इम्बॅलन्स झाला का ते समजेल. पर्सनालिटी डिसऑर्डर आहे का हेसुद्धा माहीत करता येईल. यामध्ये काही सामाजिक गोष्टी, हार्मोन्स चेंज, बेनमधील केमिकल असंतुलन आहे का, त्याबरोबरच तिच्या घरातील वातावरण कसे आहे याचीही माहिती घेणे गरजेचे आहे.
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ