Liquor Pudhari
पुणे

Pune Toxic Liquor Case: पुण्यातील विषारी गावठी दारूकांडातील ९ आरोपींवर मोक्का; २१ बळी घेणाऱ्या दारूमाफियांवर सीआयडीची कारवाई

हडपसर, दापोडी-फुगेवाडी प्रकरणातील टोळीप्रमुखासह आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी दारूमुळे २१ नागरिकांचा बळी घेणाऱ्या संघटित दारूमाफियांवर अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

या प्रकरणातील टोळीप्रमुख दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे याच्यासह नऊ जणांवर मोक्काची कारवाई केली असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पश्चिम विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी त्यास मंजुरी दिली आहे.

टोळीप्रमुख दत्ता ऊर्फ भाऊ लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन), आकाश जाधव (रा. हडपसर), योगेश व्हनकडे (रा. मुंढवा), राधेश्याम प्रजापती (रा. उरुळी कांचन), कल्पेश अग्रवाल (रा. खडकी), आर्यन धोत्रे (रा. वडारवाडी), अभिषेक अरुण चौबे, अरुण जगदंबा चौबे, अंकित अरुण चौबे (तिघे रा. नवी मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.

हडपसर येथे चार, तर दापोडी-फुगेवाडी परिसरात १७ अशा एकूण २१ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला.

तपासादरम्यान दत्ता ऊर्फ भाऊ लोंढेने आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी उभी करून हातभट्टीची दारू तयार करून विक्रीचे जाळे उभारल्याचे उघड झाले. आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, प्रतिबंधात्मक कारवायांनंतरही त्यांच्यात कोणताही फरक पडला नव्हता. त्यामुळे या टोळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोक्का लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक श्यामराव काळे यांनी केलेल्या तपासानंतर पोलिस अधीक्षक शफाकत आमना यांच्या माध्यमातून विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. कायदेशीर पडताळणीनंतर मोक्का लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT