कसबा पेठ : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात शहरातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी हजारो पर्यटक पुणे शहरात येत असतात. शहरातील मध्यवर्ती भागातील शनिवारवाडा, लालमहाल, नाना वाडा, महात्मा फुले वाडा या स्थळे पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
शनिवारवाडा पाहण्याच्या वाढत्या आकर्षणामुळे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी शनिवार-रविवार, सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांना गाड्या पार्क करायला जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे पर्यटकांमधून नाराजीच सूर ऐकू येत असून पर्यटकांना वाहतूक कोंडीने पुणे दर्शन घडविले.
लाल महाल, नाना वाडा, पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस तसेच दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, जोगेश्वरी मंदिर, तुळशीबागेत रविवार (दि. 28) नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. अनेक पर्यटक सेल्फी विथ शनिवारवाडा सोबत फोटो काढण्यात तसेच व्हिडिओ शूटिंग करण्यात गुंतलेले दिसून आले.
शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार परिसरात तसेच शिवाजी रस्त्यावरील फूटपाथवर अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस खाद्यपदार्थ व इतर फुटपाथ विक्रेत्यांच्या वाढ झाली आहे. कारवाई झाली तर ती नाममात्र असते दुसऱ्या दिवशी परत त्या जागी विक्रेते दिसून येतात. त्यामुळे शनिवारवाड्याची अतिक्रमणामुळे पडलेला वेढा कधी सुटणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शनिवारवाडा पार्किंगमध्ये प्रवेश करण्यासाठी शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता अशा दोन्ही बाजूंनी दुचाकी व चारचाकीसाठी प्रवेश करतो येतो. मात्र शिवाजी रस्त्यावरील लोखंडी गेटमधून फक्त दुचाकीच आत सोडण्यात येत होत्या. तसेच बाजीराव रस्ता गेटवरूनच दुचाकी व चारचाकी वाहनांना आत सोडण्यात येत असल्याने बाजीराव रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले. तसेच याबाबत दर्शनीभागात माहिती फलक, गॉर्ड नसल्याने गाड्या पार्क करायच्या कुठे? या गोंधळात पर्यटक शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर गोंधळलेले अवस्थेत थांबलेले दिसत होते. त्यामुळे या शिवाजी रस्त्यावरील प्रवेशद्वारावरूनच पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
शनिवारवाडा परिसरात पार्किंगफुल असल्याने पर्यटकांना गाड्या पार्क करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. तसेच जवळपास कोणतेही वाहनतळ उपलब्ध नसल्याने पर्यटकांनी परिसरात बाजीराव व शिवाजी रस्त्यावर नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्या होत्या. परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, पिण्याचे पाणी याबाबत माहिती फलकाच नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरत आहे.