

पुणे : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
सवित्री तुकाराम भारता (वय ५२) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गणेश राम पुजारी (वय २०), संतोष परमेश्वर जाधव (वय २१), दोघे रा. नवीन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर) साहिल विशाल सावंत (वय १९), रा. गोसावीवस्ती, हडपसर) यांना अटक करण्यात आली. तर रोहन गायकवाड, रोहित गायकवाड, दीपक सरोदे, अंबाजी शिंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेखर तुकाराम भारता (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर, त्यांची आई, चुलत भाऊ हे २६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घराजवळ बसले होते. त्यावेळी जुन्या भांडणातून रोहन गायकवाडने शेखरच्या चुलतभावाशी वाद घालण्यास सुरुवात केली. शेखरच्या आईने भांडणात मध्यस्थी केली. त्यावेळी आरोपींनी शेखरच्या आईवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
आरोपींनी फिर्यादीच्या मावशी चंद्रमा कंडमची यांना दगडाने मारहाणही केली. पसार झालेल्या तिघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोणे करत आहेत.