Pune Timber Market Fire Pudhari
पुणे

Pune Timber Market Fire: पुण्यात टिंबर मार्केटला भीषण आग; ४५ दुकाने, सहा घरे जळून खाक

भवानी पेठेत मध्यरात्री अग्नितांडव; ३१ अग्निशमन वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण, कोट्यवधींचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. जय वल्लभ शाळेजवळील लाकूड साहित्याच्या दुकानांना लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. दुकानांमधील लाकडाच्या साठ्यामुळे आगीचा भडका उडत गेला. या आगीत प्लायवूडच्‍या दुकानांसह ४५ दुकाने, सहा घरे जळाली. यामध्ये एका वाहनाचे मोठे नुकसान झाले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली. पुणे महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पीएमआरडीएच्या एकूण ३१ अग्निशमन वाहनांच्या मदतीने काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्षाला २ वाजून ५ मिनिटांनी आगीची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन मुख्यालयातून पहिला अग्निशमन बंब आणि पाण्याचा टँकर तातडीने रवाना करण्यात आला. अवघ्या चार मिनिटांत, म्हणजेच २ वाजून ९ मिनिटांनी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ आग विझविण्यास सुरुवात केली. मात्र, दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड साहित्य असल्याने आगीने वेगाने पेट घेतला. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडून अन्य अग्निशमन केंद्रांची कुमक मागविण्यात आली. आगीचे भीषण स्वरूप पाहून स्टेशन ड्युटी ऑफिसर पंकज जगताप यांनी सर्वप्रथम परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आग नियंत्रणात आणली. मात्र, आगीची झळ जवळील सहा घरांनाही बसली. वाहनाचेही नुकसान झाले.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे महापालिका अग्निशमन दलाचे २० बंब आणि चार पाण्याचे टँकर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा एक बंब, पीएमआरडीएचा एक बंब आणि एक टँकर, तसेच चार जेसीबी घटनास्थळी दाखल झाले होते. एकूण ३१ अग्निशमन वाहनांसह १० अधिकारी आणि १५० जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दोन तासांनंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर पुन्हा आग भडकू नये, यासाठी कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनवणे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय भिलारे यांच्यासह राजेश जगताप, पंकज जगताप, प्रमोद सोनावणे, कमलेश चौधरी, कैलास शिंदे, नीलेश महाजन, समीर शेख, सुनील, प्रशीत, प्रकाश गोरे आणि संजय रामटेके यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

आगीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांतील नागरिकांना आठ नंबर कॉलनी ट्रान्झिट कॅम्प येथील निवारा केंद्रात स्थलांतरित केले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे. महापौर मंजूषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. पोलिस दल, १०८ रुग्णवाहिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्यात सहकार्य केले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तीन वर्षांपूर्वीही लागली होती आग

सन २०२३ मध्येही टिंबर मार्केट परिसरात आगीची घटना घडली होती. यावेळी तब्‍बल १२ तासाहून अधिक काळ आग विझविण्याचे काम सुरू होते. तर रात्रीला लागेल्या आगही पूर्णपणे विझविण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. २०२३ च्या तुलनेत या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्‍याचे बोलले जात आहे.

काय असतो बिग्रेड कॉल

दहापेक्षा अधिक अग्निशमन दलाच्‍या वाहनांचा उपयोग एखाद्या आगीच्‍या ठिकाणी झाल्‍यास त्‍याला ब्रिगेड कॉल म्‍हटले जाते. बुधवारी पहाटे लागलेली आग हा ब्रिगेड कॉल होता.

भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केट येथे झालेली दुर्घटना वेदनादायक आहे. सकाळी या ठिकाणी भेट दिली. या वेळी ज्या ठिकाणी हे गोडाऊन होते ते अनधिकृत असल्याचे आढळले. संबंधित जागा महापालिकेची आरक्षित जागा आहे. पण, ती अद्याप ताब्यात यायची आहे. या जागेवर हे गोडाऊन उभारण्यात आले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
मंजूषा नागपुरे, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT