पुणे: गाढ झोपेत असलेल्या टिंबर मार्केट परिसरात बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास अघटित घडले. अचानक भडकलेल्या भीषण आगीत सुमारे ४५ दुकाने आणि घरे क्षणात जळून खाक झाली.
या अग्नितांडवात स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, कष्टाने उभारलेला संसार आणि व्यवसाय डोळ्यादेखत राख झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन बाधित नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध फुटला.
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या स्थानिक नागरिक आशा पवार आपली व्यथा मांडताना म्हणाल्या, या आगीत आमची घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आमच्या कुटुंबाचा आधारच या आगीने हिरावून घेतला असून, पवार कुटुंबाचे कधीही न भरून निघणारे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आमच्या परिसरातील दुकाने आणि घरे जळणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सुमारे अडीच ते तीन कोटींच्या घरात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आणि घरे एकाच ठिकाणी असल्याने ते आता अक्षरशः उघड्यावर आले आहेत. शासन आणि लोकप्रतिनिधींनी या संकटाच्या काळात व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.शिराज शेख, अध्यक्ष, अंगडशहा बाबा व्यापारी संस्था
पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या या आगीने होत्याचे नव्हते केले. लाकूड आणि इतर साहित्य असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले असून, वर्षानुवर्षांची कमाई जळून खाक झाली आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधितांना आर्थिक मदत जाहीर करावी.खाजाभाई शाबई, उपाध्यक्ष, अंगडशहा बाबा व्यापारी संस्था, १०३ भवानी पेठ
पहाटे आरडाओरडा ऐकून आम्ही धावत बाहेर आलो, पण आगीचे लोट इतके भीषण होते की दुकानातील एकही वस्तू वाचवता आली नाही. आमच्या उपजीविकेचे एकमेव साधन या आगीत भस्मसात झाले आहे. आता पुन्हा नव्याने व्यवसाय कसा उभा करायचा, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे.सलीम अब्दुल रहमान शाबई, स्थानिक व्यापारी
रात्री सर्व व्यवहार आटोपून आम्ही निश्चिंत होऊन घरी गेलो होतो, पण पहाटे आलेल्या एका फोनने आमचे आयुष्यच बदलून टाकले. दुकानातील सर्व माल जळून राख झाला आहे. या आगीत फक्त लाकूड किंवा सामान जळाले नाही, तर आमची स्वप्नेही जळून खाक झाली आहेत. शासनाने तातडीने आर्थिक मदत करून दिलासा द्यावा.संदीप पाटोळे, स्थानिक व्यापारी