Chandrakant Patil Pudhari
पुणे

Pune Teachers Graduates MLC Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची ‘मेगा’ यंत्रणा; चंद्रकांत पाटलांकडे प्रभारीपद

स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची फळी; शिक्षक-पदवीधरांपर्यंत थेट पोहोचण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन्ही जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक ताकद पणाला लावली आहे. उमेदवारांच्या प्रचारासोबतच मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्या साठी भाजपने राज्यातील दिग्गज नेत्यांची फळी मैदानात उतरवली आहे.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवडणूक समितीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भाजपने पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी सोमवारी जल्लोषपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर आता पक्षाने निवडणुकीच्या संघटनात्मक नियोजनाला अधिक वेग दिला आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. ६) निवडणुकी साठीच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे पुणे शिक्षक व पदवीधर निवडणूक समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद लाड यांची सहप्रमुख, तर पक्षाच्या शिक्षक प्रकोष्ठाचे संयोजक डॉ. प्रशम कोहळे यांचीही सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षक-पदवीधरांपर्यंत थेट पोहोचण्याची रणनीती

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे संपूर्ण निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक समन्वयाची जबाबदारी राहणार आहे. खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि माधुरी मिसाळ हे सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. शिक्षक व पदवीधर मतदारांशी थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांचा आढावा, कार्यकर्त्यांची बांधणी आणि मतदानाचे नियोजन, यावर या यंत्रणेचा भर राहणार आहे. पुणे विभागातील दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ६ ऑक्टोबर असून, २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यामुळे पुढील काळात भाजपच्या प्रचार आणि संघटनात्मक हालचालींना वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT