पुणे: पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत संघटनात्मक ताकदीच्या जोरावर महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी व्यक्त केला. डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी गेल्या सहा महिन्यांपासून २५ हजार कार्यकर्ते सक्रिय असून, प्रत्येक कार्यकर्त्याने किमान दहा मतदारांशी संपर्क साधल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी महायुतीने व्यापक यंत्रणा उभी केल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पांडे बोलत होते. या वेळी शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे उपस्थित होते. पांडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात महायुती निवडणूक लढवत आहे. वरिष्ठ नेत्यांनीही मतदारसंघात प्रचारासाठी दौरे केले आहेत. कार्यकर्त्यांच्या संपर्क मोहिमेमुळे मतदानाची टक्केवारी वाढेल आणि त्याचा फायदा दोन्ही उमेदवारांना होईल.
गावडे यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करताना विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. आता हे प्रश्न विधानभवनात मांडण्याची संधी मतदारांनी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा वचननामा असून, त्यातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या सेवाविषयक अडचणी, न्याय्य हक्क आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांची आपल्याला प्रत्यक्ष अनुभवातून जाणीव आहे. शिक्षण संस्थेच्या प्रशासनात काम केल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांचे स्वरूप समजले आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत शिक्षक, प्राध्यापक आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी काम केले असून, या कामाच्या आधारे मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे, असे गावडे यांनी सांगितले.
शिक्षकांच्या सेवाविषयक अडचणी, त्यांच्या मागण्या आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची मला प्रत्यक्ष अनुभवातून जाणीव आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत शिक्षक, प्राध्यापक आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर काम केले आहे. निवडणुकीचा जाहीरनामा हा माझ्यासाठी वचननामा असून, त्यातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कौस्तुभ मुरलीधर गावडे, महायुतीचे उमेदवार, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ