कोंढवा: टँकरमधून रस्त्यावर होणार्या पाणीगळतीमुळे दुचाकी अपघातांत वाढ झाली आहे. अनेकांना गंभीर दुखापतीबरोबरच अपंगत्व आले आहे. पाण्याची गळती होणार्या टँकरर्स कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
उंड्री, महंमदवाडी, कोंढवा, पिसोळी, वानवडी या भागात महापालिकेच्या व खासगी टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही टँकर सुस्थितीत पाहायला मिळतात, तर काही टँकरची अवस्था अगदीच वाईट आहे. रस्त्यावरून जाताना पाणीगळती होतेच होते.
शिवाय, चढाच्या ठिकाणी टँकरच्या वरच्या भागातून धो-धो पाणी रस्त्यावर पडते. यामुळे रस्ता निसरडा होतो. त्यामुळे दुचाकी वाहने या रस्त्यावर घसरत आहेत. यामध्ये युवकांचा व ज्येष्ठ नागरिकांचे अपघात जास्त प्रमाणात होत आहेत.
पाण्याच्या जास्तीत जास्त खेपा कशा होतील, त्या पद्धतीने टँकरची गती पाहायला मिळते. काही टँकरची अवस्था अशी आहे की, त्यांच्या नंबरप्लेटदेखील दिसत नाहीत. कर्णकर्कश हाॅर्नच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांची धांदल उडून जाते.
साळुंखे विहार रस्त्यावरून एनआयबीएम रस्त्याकडे जाताना सूर्या हार्डवेअर दुकानासमोर गुरुवारी दुपारी एका युवकाचा अपघात झाला, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. असे अपघात टँकरमधील पाणीगळतीमुळे अनेक ठिकाणी होत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.