पुणे: कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातानंतर भरपाईच्या नावाखाली २१ वर्षीय तरुणीकडून ऑनलाइन ५० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. करिअरचे नुकसान करण्याची धमकी देऊन तरुणीवर पैसे देण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळ हा प्रकार घडला.
याप्रकरणी मयूर राजेंद्र रंगदळे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) याच्याविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास अमेझ कारमधून घरी जात होती.
निलायम पुलाच्या आधी स्वामी समर्थ मंदिरासमोर तिच्या कारचा पुढील उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कारवरील तिचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी मागून येणाऱ्या लाल रंगाच्या मारुती सुझुकी व्हिक्टोरिस कारने तिच्या कारला पाठीमागून घासले.
संबंधित कारचालकाने दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या अपघातानंतर दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळ तरुणीला करिअरचे नुकसान करण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली तिच्याकडे पैशांची मागणी करून दबाव टाकण्यात आला. त्यानंतर तिच्याकडून ऑनलाइन ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दि. १७ ऑक्टोबर रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.