पुणे: खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्याने महिलेच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना 7 जानेवारीला घडली होती. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने आरोपीला अटक करत त्याच्याकडून 18 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधित आरोपी सराईत असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
जयेश चंद्रशेखर खिच्ची (वय 39, रा. मांजरी खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुपर मार्केटमध्ये खरेदीच्या बहाण्याने एक जण येरवडा परिसरातील जाधवनगरात 7 जानेवारीला गेला होता. त्यावेळी तक्रारदार महिलेने शिलाई मशिनवर पिशवीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड चोरून चोरटा पसार झाला.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 18 जानेवारीला दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक दोनमधील अंमलदार राहुल इंगळे व प्रफुल्ल मोरे यांना आरोपीची माहिती मिळाली. हडपसर माळवाडी सिरम कंपनीजवळ एक जण सोने विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळाली. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने धाव घेत जयेश चंद्रशेखर खिच्ची याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता सोन्याचे मोठे मंगळसूत्र, मंगळसूत्र, झुमके जोड, सोन्याची अंगठी असे 139 ग््रॉम सोन्याचे दागिने, दुचाकी जप्त केली.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छगन कापसे, एपीआय सी. बी. बेरड, उपनिरीक्षक एस. जे. तानवडे, कैलास चव्हाण, राजू पुणेकर, परेश सावंत, गणेश लोखंडे, दत्तात्रय खरपुडे, मयूर सूर्यवंशी, राहुल इंगळे, प्रफुल्ल मोरे, विनायक येवले, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांनी केली.
घरफोडीचे सात गुन्हे दाखल
आरोपी जयेश खिच्ची हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हडपसर, चंदननगर, महाड शहर (रायगड), वानवडी, कोंढवा, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे सात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास करण्यात येत असून, गुन्ह्याची पद्धत तपासली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.