Railway  Pudhari
पुणे

Pune Summer Special Trains: पुण्यातून उन्हाळी विशेष गाड्या; रेल्वेच्या 306 फेऱ्या, एसटीच्या 74 जादा बस

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाची तयारी; उत्तर भारत व पर्यटनस्थळांसाठी अतिरिक्त सेवा सुरू

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: उन्हाळी सुट्टीत मे-जून महिन्यातील पर्यटकांची गर्दी आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेऊन रेल्वे, एसटी प्रशासनाने कंबर कसली आहे. पुणे विभागातून एसटी महामंडळाच्या 74 जादा गाड्या आणि मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून तब्बल 306 विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या निर्णयामुळे आता प्रवाशांची गर्दीतून होणारी दगदग कमी होणार असून, प्रवास सुखकर होणार आहे.

रेल्वेच्या 306 फेऱ्यांचे मेगा नियोजन

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विशेष उन्हाळी फेऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारत आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय केली आहे.

  • पुणे- दानापूर :- सर्वाधिक 212 फेऱ्या

  • पुणे- गोरखपूर :- 60 विशेष फेऱ्या

  • पुणे- नागपूर :- 26 फेऱ्या

  • एकूण - 306 फेऱ्या

एसटीचा गाववारी आणि पर्यटनासाठी मोठा आधार

एसटी महामंडळाच्या पुणे विभागातील 14 डेपोंमार्फत 74 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, नारायणगाव, भोर, सासवड, शिरूर, दौंड, बारामती आणि बारामती एमआयडीसी या डेपोंमधून विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी गाड्या धावतील. यामध्ये प्रामुख्याने सप्तशृंगी गड, माहूर, नाशिक, उदगीर, जळगाव, महाड, निलंगा, औराद, अहमदपूर, धुळे, साक्री, अकोला, अहमदनगर, निघोज, कल्याण, अहिल्यानगर (मिरजगाव), बीड (टेंभुर्णी), परळी, सोलापूर, तुळजापूर, श्रीरामपूर, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, मोहटादेवी, गाणगापूर आणि गणपतीपुळे या मार्गांचा समावेश आहे.

उन्हाळी सुटीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठी प्रतीक्षा यादी असते. हे लक्षात घेऊन आम्ही दानापूर आणि गोरखपूरसह नागपूरसारख्या मार्गांवर 306 विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यासोबतच आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर होल्डिंग एरिया, कंट्रोल रूम बनविण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांची गर्दी वाढताच आरपीएफ आणि रेल्वे कर्मचारी अधिकाऱ्यांचीही संख्या वाढविणार आहे.
हेमंतकुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग
पुणे विभागातील 14 डेपोंमधून आम्ही 74 जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. ग््राामीण भागातील प्रवाशांची सोय आणि उन्हाळी पर्यटनासाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख स्थळांना आम्ही प्राधान्य दिले आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटीचा लाभ घ्यावा.
कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT