पुणे: शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. चाकण येथे भटक्या श्वानांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. शहरात दररोज सरासरी 87 नागरिकांना भटके श्वान चावा घेतात. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांनंतर श्वानांची संख्या वाढली असून, या श्वानांचे श्वानांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करण्याचे मोठे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागापुढे आहे.
शहरात दीड लाख भटके श्वान असल्याचा अंदाज आहे. मात्र, ही संख्या 3 लाखांवर आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, 2025 या वर्षात 31 हजार 667 नागरिकांना श्वानांनी चावा घेतला. यामध्ये भटके तसेच पाळीव श्वान या दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. सरासरी दररोज सुमारे 87 नागरिक जखमी होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. श्वानसंख्या वेगाने वाढते. त्या तुलनेत लसीकरण आणि निर्बीजी करणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. मात्र अपुऱ्या संसाधनांच्या मदतीने उद्दिष्ट गाठताना पालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, लसीकरण व निर्बीजीकरण मोहिमेला गती द्यावी तसेच समाविष्ट गावांमध्येही विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात 1 लाख 79,940 श्वानांची नोंद
महापालिका प्रशासनाने मे 2023 मध्ये भटक्या श्वानांची गणना केली होती. या गणनेत शहरात 1 लाख 79 हजार 940 श्वानांची नोंद झाली होती. त्याआधी 2018 मध्ये ही संख्या 3 लाख 15 हजार होती. त्यात पाच वर्षांत मोठी घट झाली. मात्र नंतर महापालिकेत 34 गावे समाविष्ट झाल्याने या गावांतील भटक्या श्वानांची त्यात भर पडली. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या अडीच लाखांवर पोहचली आहे.
47,973 श्वानांची नसबंदी व लसीकरण
शहरातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे आणि रेबिजसारख्या संसर्गजन्य आजारांवर प्रभावी आळा घालणे, या उद्देशाने महापालिकेतर्फे श्वान नसबंदी व लसीकरण मोहीम सुरू आहे. 2025-26 वर्षात महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 26 जानेवारीपर्यंत एकूण फक्त 47,973 श्वानांची नसबंदी व लसीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
रेबिजमुक्त शहराचे उद्दिष्ट कधी गाठणार?
महापालिकेने 2030 पर्यंत पुणे शहर ’रेबिजमुक्त’ करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. मात्र, मर्यादित मनुष्यबळ, अपुरी वाहने तसेच लसीकरण व निर्बीजीकरणासाठी अपुरी जागा. त्यात कामाचा वेग कमी यामुळे हे उद्दिष्ट गाठणे कठीण दिसत आहे.
बंदिस्त डॉग शेल्टरची उभारणी
भूगाव व शिंदेवाडी या ठिकाणी पुणे शहरातील भटक्या व मोकाट श्वानांसाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बंदिस्त डॉग शेल्टर (श्वान निवारा) उभारण्याचे काम महापालिकेमार्फत चालू आहे. शहरातील प्राणीपालकांना (पाळीव श्वान व मांजरी) अद्ययावत आणि सुसज्ज डॉग पार्क उभारण्याचे नियोजन असून, त्याकरिता 2.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एस. पी. व्ही. वाहन खरेदी करण्यासाठी 3.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, भटक्या व मोकाट श्वानांना फीडिंग पोइंट खाद्यपुरवठा करण्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाने दिले आदेश; मात्र अंमलबजावणी होईना!
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी देशभरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडासंकुले, बसस्थानके, आणि रेल्वेस्थानक या सर्व परिसरातून भटक्या श्वानांना ’तत्काळ’ हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनेही श्वानांना पडकून त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करून त्यांना निवारा केंद्रात पाठवा, असे आदेश दिले आहेत. यासाठी महापालिका पशुवैद्यकीय विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, त्या आराखड्याची प्रत्यक्षात अंबलबजावणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
महापालिका म्हणते, तातडीच्या उपाययोजना करणार
चाकणप्रमाणे पुणे शहराच्या हद्दीत सुदैवाने आजवर श्वानदंशामुळे कुणी जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. मात्र, श्वानदंशाची एखादी घटना घडल्यावर तातडीने महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाची गाडी संबंधित ठिकाणी पाठवली जाते. त्याचप्रमाणे कुत्र्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याचे लसीकरण झाले आहे का नाही? याची तपासणी करून त्याप्रमाणे उपाययोजना केल्या जातात, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
चार वर्षांत दुप्पट संख्या
शहरात श्वानदंशाच्या घटनांमध्ये गेल्या चार वर्षांत चिंताजनक वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. चार वर्षांत श्वानदंशाच्या घटनांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भटक्या श्वानांची वाढती संख्या, निर्बंधित नसलेले प्रजनन, तसेच पुरेशा प्रमाणात नसलेली लसीकरण आणि नसबंदी मोहीम ही यामागील प्रमुख कारणे आहेत. अनेक भागांत कचऱ्याचे ढीग आणि उघड्यावर टाकला जाणारा अन्नकचरा यामुळे श्वानांची वस्ती वाढत असल्याचेही निरीक्षण आहे. दरम्यान, महापालिकेकडून नसबंदी आणि लसीकरण मोहिमा राबविल्या जात असल्या, तरी त्या अपुऱ्या ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.