

पुणे: पुणे महापालिका हद्दीतील समाविष्ट गावांमध्ये असलेल्या चारही नगर रचना योजना (टीपी स्कीम) नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महापालिका कार्यवाही करणार की पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यासंबंधीचा निर्णय पावसाळी आधिवेशनापूर्वी म्हणजेच तीन ते चार महिन्यांत घेतला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
पुणे महापालिकेत समाविष्ट 23 गावांमध्ये मान, वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी व दोन होळकरवाडी अशा पाच नगर रचना योजनांचा समावेश आहे. या मधील चार योजनांना राज्य शासनाने जुलै 2025 मध्ये मंजुरी दिली आहे. मात्र, त्यावर पुढे काहीच कार्यवाही होत नसून या नगर रचना योजनांमधून प्रस्तावित असलेल्या रिंगरोडचे काम प्रलंबित असल्याबाबत आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित केली होती.
त्यावर उत्तर देताना डॉ. सामंत म्हणाले, वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी व दोन होळकरवाडी अशा चारही नगर रचना योजनांना शासनाने मंजुरी दिली आहे. या चारही नगर रचना योजनांसाठी लवादांची नेमणूक केली असून, त्यांच्याकडून नगर रचना योजनेमधील जागेची मोजणी, अंतिम भूखंडांचा ताबा देणे घेणे व मालमत्ता पत्रक तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
या नगर रचना योजनांमधून पुणे सोलापूर रस्ता ते पुणे सातारा रस्ता यामधील रिंगरोडपैकी 5. 27 किमी लांबीचा रिंगरोडचा समावेश आहे. या रिंगरोडच्या भागातील खासगी जमिनीचे भूसंपादनाचे काम पीएमआरडीएमार्फत सुरू असून, वन जमिनी ताब्यात घेण्याबाबतचा प्रस्ताव पीएमआरडीएकडून वन विभागास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे नगर रचना योजनांमुळे इनर रिंगरोडच्या कामकाजावर कोणताही विपरित परिणाम झालेला नसल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले. महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीए करण्यात आलेली नियुक्ती शासनाने रद्द केलेली आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमधील चारही नगर रचना योजनावर कोणत्या प्राधिकरणाने कार्यवाही करायची याबाबत कायदेशीर बाबी तपासून येत्या तीन ते चार महिन्यांत निर्णय घेतला जाईल. तसेच येथील प्रश्नांबाबत पुणे महापालिका आयुक्तांसमवेत बैठक आयोजित करून ते सोडविण्याचे निर्देश दिले जाईल, असेही डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.