संतोष चोपडे
जुन्या प्रभाग क्रमांक 20 मधील पुणे स्टेशन आणि ताडीवाला रोड या भागाचा समावेश आता नवीन प्रभाग क्रमांक 13 मध्ये करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून दिले. मात्र, मतदारांना मूलभूत सोयी-सुविधांसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अद्यापही वणवण करावी लागत आहे.
पाण्याची गंभीर समस्या सोडवता आली नाही, ड्रेनेजला घुशींनी पोखरले आहे. स्वच्छतागृह आणि कचरा समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्येक निवडणुकीत मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात लाखो रुपयांचा निधी मिळूनही कागदपत्रांवर दरवर्षी विकासकामांचा खर्च दाखवून लोकप्रतिनिधींनी मतदारांची दिशाभूल केली आहे. यास ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय प्रशासनही जबाबदार असून, प्रभागाचा विकास भकास झालाय. संधी मिळूनही प्रभागातील नगरसेवकांनी मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला नाही. त्यामुळे नागरिकांकडून या प्रस्थापित लोकप्रतिनिधीवर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
अवैध धंद्यांना आळा घातला नाही, भाजी मंडई अतिक्रमणाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. अरुंद रस्ते असल्याने वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या आहे. परिणामी, अग्निशमन दल गाडी दुर्घटनास्थळी पोहचू शकत नाही. जुन्या बाजारातील व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे, कागदीपुरा येथील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या सुटलेल्या नाहीत तसेच नाल्याचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. येरवडा, जय जवाननगर, जुना बाजार, भराव आदी भागांत वाहतूक कोंडी आणि पार्किंग प्रश्न मोठा आहे. पुणे स्टेशनला महापालिकेचे वाहनतळ असतानाही ते पूर्णक्षमतेने चालविले जात नाही. योग्य उपाययोजना करून पार्किंग पूर्णक्षमतेने चालले तर स्टेशन परिसरात अनधिकृत पार्किंग होणार नाही. येथील व्यावसायिकांचे स्वतःचे पार्किंग नाही. पुणे स्टेशनची सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आहे. बहुतांश परिसर शासकीय इमारतीचा आहे. त्यामुळे विकास निधी नेमका कुठे खर्च झाला आहे, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. चौघा नगरसेवकांनी प्रभागातील काही भाग वाटून घेतला होता. मात्र, गेल्या काळात स्टेशन परिसराच्या विकासाकडे माजी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रभागात या भागांचा समावेश
जय जवाननगर, लडकतवाडी, ढोले पाटील रोड, साळवेनगर, पांडूलमानवस्ती, पवळे चौक, कुंभारवाडा, छोटा शेख सल्ला दर्गा, शिवाजीनगरचा काही भाग, आरटीओ परिसर, राष्ट्रीय शीत केंद्र, पुणे रेल्वे स्थानक, अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालय, जहांगीर आणि रुबी रुग्णालय, नवीन जिल्हा परिषद, सेंट्रल बिल्डिंग, पोलिस आयुक्तालय, समाजकल्याण आयुक्तालय आदी भागांचा या प्रभागात समावेश आहे.
विकासकामे निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. ड्रेनेजला घुशी लागल्या आहेत. अवैध धंद्यांना जोर, कोरोना काळातील किट सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नाहीत.प्रदीप ओव्हाळ, सामाजिक कार्यकते.
प्रभागात झालेली प्रमुख कामे
ताडीवाला भागात मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकली, कैलास स्मशानभूमी, मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीत सुविधांची उपलब्धता, जनता विद्यालय आणि सजनाबाई भंडारी शाळेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध, डॉ. नायडू रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारणी आणि व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध, पंचशील चौकात डायग्नोस्टिक सेंटर सुरू, ताडीवाला भागात रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पाणीटंचाईच्या भागात बोअरवेल बसवले.
2017 पूर्वी पाणीपुरवठा सुरळीत होता. ब्रिटीशकालीन जलवाहिनी असल्यामुळे पाण्याच्या गळतीबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. 24/7 प्रकल्पानुसार प्रभागात एकही पाण्याची टाकी नाही. ताडीवाला भाग उंच आणि सकल असल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय चालू झाल्यास अधिकच्या पाण्याची गरज लागणार आहे. कचरा वर्गीकरणाला जागा नाही. बहुसंख्य वस्ती रेल्वेच्या जागेत असल्याने रेल्वे प्रशासन झोपडी तोडण्याच्या नोटिसा देते, या भीतीचे सावट दूर करण्यासाठी मनपा आयुक्तांनी राज्य, केंद्र सरकारला झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठविला आहे. धारावीच्या धर्तीवर या भागात पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात यावा.प्रदीप गायकवाड माजी नगरसेवक
प्रभागातील प्रमुख समस्या
ताडीवाला भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई, पुणे स्टेशन आणि ताडीवाला भागात अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत आहेत. ससून रुग्णालयासमोरील रस्त्याच्या पदपथावर अनधिकृत पथारी, व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, झोपडपट्टी भागात अरुंद रस्त्यावरील अनधिकृत भाजी मंडई, पुणे स्टेशन रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी आणि पार्किंग व्यवस्थेचा अभाव, झोपडपट्टी भागात मूलभूत सुविधांचा अभाव, सार्वजनिक स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था.
गेल्या पंचवार्षिकमध्ये महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना पुरेसा विकास निधी दिला नाही. प्रभागात जागा उपलब्ध नसल्याने नवीन प्रकल्प होत नाहीत. नागरी समस्या सोडविणे आणि जुन्या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी बहुतांश निधी खर्च होतो.अरविंद शिंदे, माजी नगरसेवक
ताडीवाला भाग दाट लोकवस्तीचा आणि अरुंद रस्त्यांचा आहे. रिकाम्या जागा नाहीत. त्यामुळे नवीन प्रकल्प सुरू करता येत नाहीत.चाँदबी नदाफ, माजी नगरसेविका
मनपा शाळा पटसंख्या कमी आहे. या शाळांना विकास निधी दरवर्षी येत असतो. तरीपण शाळेची दुरवस्था झाली आहे. मनपा राजीव गांधी रुग्णालय भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. चार मजली इमारत आहे. पण, गोरगरिबांना फायदेशीर नाही. भाजी मंडई असताना चौकाचौकांत भाजी विक्री थांबल्याने अतिक्रमण वाढले आहे, याला जबाबदार प्रशासन आहे. विविध विकासकामांच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी दोन-दोन कोटींचे बजेट लागते. मात्र, बजेट कुठे खर्च होते? यास लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार आहे. कामांची बोगस बिले काढली जातात.अकबर खान, सामाजिक कार्यकर्ते