पुणे: पुणे विभागातील एसटी प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होण्याची चिन्हे आहेत. विभागातील वाढती गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पुणे एसटी विभाग प्रशासनाने तब्बल 200 नवीन बसची मागणी मुख्यालयाकडे केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, रोजच्या गर्दीच्या कटकटीतून सुटका होणार आहे.
पुणे हे शिक्षणाचे आणि नोकरीचे केंद्र असल्याने येथून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या बसच्या तुलनेत प्रवाशांचा ओघ प्रचंड वाढला आहे.
परिणामी, अनेक मार्गांवर प्रवाशांना उभे राहून किंवा ताटकळत प्रवास करावा लागतो. हीच कटकट थांबविण्यासाठी पुणे विभागाने आता कंबर कसली असून, 200 जादा बससाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या नवीन बस ताफ्यात दाखल झाल्यास फेऱ्यांची संख्या वाढेल आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सध्या पुणे विभागात धावतात 857 बस
सध्या पुणे विभागातील 14 डेपोअंतर्गत 852 बसद्वारे प्रवासी सेवा पुरवली जात आहे. विकेंड, सण आणि दिवाळी, उन्हाळी सुट्यांच्या काळात एसटीच्या बसगाड्यांना मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या जादा बसगाड्यांची मागणी पुणे विभागाकडून केली जात आहे.
पुणे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांना वेळेत आणि सुखाचा प्रवास मिळावा, यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत. सध्याच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि नवीन मार्ग सुरू करण्यासाठी पुणे विभागाला 200 नवीन बसची आवश्यकता आहे. त्याबाबतची सविस्तर मागणी आम्ही वरिष्ठपातळीवर केली आहे. या नवीन बस उपलब्ध होताच फेऱ्यांची संख्या वाढवली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागणार नाही आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल.अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग