पुणे: कौटुंबिक वादातून मुलाने ८० वर्षीय वडिलांच्या डोक्यात फावडे घालून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
जगन्नाथ धोंडू होडे (वय ८०, रा. वेताळबाबा मंदिराजवळ, जयभवानीनगर, जनता वसाहत, पर्वती) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा रामचंद्र होडे (वय ४६) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी धनंजय रौंदळ यांनी याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. होडे कुटुंबीय मूळचे चिपळूण येथील असून, पुण्यातील जनता वसाहत परिसरात वास्तव्यास आहे.
जगन्नाथ होडे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. त्यांचा मुलगा रामचंद्र हा कोणतेही काम करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन आहे. २ नोव्हेंबर रोजी जगन्नाथ आणि रामचंद्र यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादातून रामचंद्रने घरातील फावड्याने वडिलांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात जगन्नाथ गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबीय त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण येथे घेऊन गेले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत चिपळूण पोलिसांनी पुणे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पर्वती पोलिसांनी रामचंद्रविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी करत आहेत.