हडपसर: निकृष्ट दर्जाचे काम, हस्तांतरणातील तांत्रिक पेच आणि संबंधित विभागांतील समन्वयाचा अभाव यामुळे रविदर्शन ते मांजरी परिसरातील कवडीपाट टोलनाक्यापर्यंतचा पुणे-सोलापूर महामार्ग अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. महामार्गावरील मोठमोठे खड्डे, सलग पडलेल्या चारी आणि उखडलेला रस्ता यामुळे वाहनचालकांचा प्रवास जीवघेणा बनला असून, दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगरपालिका आणि एमएसआयडीसी या तीन विभागांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक विभाग जबाबदारी एकमेकांवर ढकलत असताना प्रत्यक्षात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार, पाठपुरावा, तसेच आंदोलने करूनही प्रशासनाकडून दुर्लक्षच होत असल्याचा आरोप होत आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांसह सलग चारींमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. किरकोळ जखमींपासून गंभीर अपघातांपर्यंत अनेक घटना घडूनही संबंधित यंत्रणा जागी होत नसल्याने “अजून किती अपघात झाल्यावर रस्ता दुरुस्त होणार?” असा संतप्त सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
हडपसर- सोलापूर रोड हा लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक मार्ग आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून, वारंवार अपघात होत आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींची निष्क्रियता नागरिकांच्या जीवाशी खेळणारी आहे. अपघातांची संख्या वाढण्याची वाट न पाहता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.ॲड. प्रियंका सातभाई, नोटरी भारत सरकार
एखादी भ्रष्ट आणि निष्काळजी व्यवस्था कशी काम करते आणि त्या व्यवस्थेचे पडसाद सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर कसे उमटतात, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रवीदर्शन ते कवडीपाट महामार्ग. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ता अल्पावधीत खराब होत असेल, तर कामाचा दर्जा, ठेकेदाराची जबाबदारी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे.अमित पवार, माजी उपसरपंच, शेवाळवाडी
पुणे- सोलापूर महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहनधारकांकडून विविध कर वसूल केले जातात. मात्र, त्या प्रमाणात सुविधा दिल्या जात नाहीत, ही अत्यंत खेदाची बाब आहे.रमेश शेवाळे
विद्युत खांब हटवून भूमिगत वाहिनी, अतिक्रमणे व अनधिकृत होर्डिंग्ज हटविणे, बसथांबा स्थलांतर, आकाशवाणी भिंत मागे घेऊन रस्ता रुंदीकरण, मांजरी फाट्यावर अंडरपास आणि रस्त्यावरील भाजी-फळ विक्रेत्यांचे पुनर्वसन या उपाययोजना तातडीने राबविल्यास हडपसरमधील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.आझीम पठाण
पुणे - सोलापूर मार्गावर शाळांच्या बस, रुग्णवाहिका आणि हजारो वाहने धावतात. संबंधित विभागांनी एकमेकांकडे बोट न दाखवता तातडीने रस्ता दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी.बाबासाहेब लोंढे