पुणे: नवीन शैक्षणिक वर्षात शहरातील बहुतांश शाळांनी पारंपरिक गणवेशाला आधुनिकतेची जोड देत 'स्मार्ट युनिफॉर्म'ची संकल्पना स्वीकारल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. आकर्षक रंगसंगती, नवीन डिझाईन, शाळेचा लोगो असलेले टी-शर्ट आणि आरामदायी कापड यामुळे शालेय गणवेश अधिक 'कलरफुल' आणि उठावदार बनला असून, खरेदीसाठी शहरातील शालेय गणवेश विक्रीच्या दुकानात विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी होत आहे.
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश इतर शाळांपेक्षा वेगळा आणि आकर्षक दिसावा, यासाठी अनेक मराठी शाळांनीही गणवेशाच्या डिझाईनमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. 'स्मार्ट युनिफॉर्म'मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते, तसेच शाळेबद्दल आत्मीयता आणि अभिमानाची भावना निर्माण होते, असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, बाजारपेठांमध्ये पालकांसोबत आलेले विद्यार्थी स्वतः गणवेशांची निवड करताना दिसत आहेत.
काही शाळांनी नियमित गणवेशाबरोबरच क्रीडा उपक्रमांसाठी स्वतंत्र टी-शर्ट आणि ट्रॅकपँटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. विशेषतः पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन गणवेशाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना आवडेल असा आकर्षक आणि आरामदायी गणवेश त्यांच्या आत्मविश्वासात भर घालतो. शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता वाढविण्यातही त्याचा मोठा वाटा असतो, असे मत विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आले.
गणवेशाच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ
गणवेश खरेदीच्या उत्साहाला यंदा किंमतवाढीची किनारही आहे. बहुतांश शाळांच्या गणवेशाच्या किमतीत यंदा दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कापड, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पूर्वी बहुतांश शाळांमध्ये पांढरे शर्ट असायचे. आता मात्र प्रत्येक शाळा वेगवेगळ्या रंगसंगती आणि पॅटर्नचे गणवेश निवडत आहे. हे रंग विद्यार्थ्यांसह पालकांनाही आवडतील, याची काळजी घेतली जाते. एकदा ठरलेला गणवेश साधारणपणे पाच ते सहा वर्षे कायम ठेवला जातो.संतोष हिंदुजा, गणवेश विक्रेते, पौड रोड.