खडकवासला: नांदेड, किरकटवाडी, खडकवासलासह सिंहगड रस्ता परिसरात गेल्या महिनाभरापासून तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चार प्रभागांत आतापर्यंत डेंग्यूचे ११२ रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासह खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा सतर्क झाली आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून कीटकनाशकांची फवारणी आणि अंतर्गत रस्ते, ओढे-नाले व गल्लीबोळांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
रस्त्यांवरील तसेच ओढ्या-नाल्यांमधील साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. नांदेड, किरकटवाडी आणि खडकवासला परिसरात ही समस्या अधिक जाणवत आहे. सरकारी दवाखाने आणि खासगी रुग्णालयांमध्येही तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
ओढे-नाले आणि रस्त्यांची स्वच्छता करून डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावीत. तसेच, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावोगावी आरोग्य पथके तैनात करावीत, अशी मागणी स्थानिक नगरसेविका धनश्री कोल्हे यांनी केली आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या देखरेखीखाली परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या परिसरात तातडीने कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. घरांमध्ये साठवलेल्या पाण्याची तपासणी करून डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट केली जात आहेत. डासांच्या अळ्या शोधून त्या नष्ट करण्याबरोबरच घरोघरी माहितीपत्रकांचे वाटप आणि आरोग्यविषयक जनजागृती केली जात आहे.अनंत चाबुकस्वार, निरीक्षक, कीटकनाशक फवारणी विभाग, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
खडकवासला आणि किरकटवाडी येथे दोन डेंग्यूचे रुग्ण नुकतेच आढळून आले आहे. त्यानंतर आरोग्य पथकाने संबंधित परिसरात घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.डॉ. शब्दा शिरपूरकर, वैद्यकीय अधिकारी, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र