

पुणे: पुणे शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर लेणीतील नंदी मंडपाच्या दुरुस्तीकामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) रोजी या कामाचा मुहूर्त करण्यात आला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) माध्यमातून मंडपाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्राचीन वास्तूला नवसंजीवनी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाताळेश्वर लेणी ही आठव्या शतकातील राष्ट्रकूटकालीन शिल्पवैभव आहे. अखंड बेसाल्ट खडकात कोरलेल्या या लेणीसमोर भव्य नंदी मंडप आहे. गोलाकार स्वरूपाच्या या मंडपाचे छत छत्रीसारखे असून ते एकूण १६ दगडी खांबांवर उभे आहे. त्यापैकी बाहेरील बाजूस १२, तर आतील बाजूंना चार खांब आहेत. दिवळीत येथे भाविक पणत्यांची आरास करतात तेव्हा हा परिसर उजळून निघतो. त्रिपुरारी पौर्णिमेला तर शेकडो नागरिक दिवे लावतात, तेव्हा या लेणीचे सौंदर्य अधिकच खुलते.
मंडपाची अवस्था गंभीर
मात्र, गेल्या काही वर्षांपासून मंडपातील काही खांबांना तडे गेल्याने वास्तूच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. मार्च २०२४ मध्ये मंडपाची अवस्था गंभीर झाल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने प्रथम प्रसिद्ध केले होते. काही भागाची पडझड झाल्याने तेथे सावधान राहण्याची पाटी लावण्यात आली होती. मात्र, निधीअभावी संवर्धनाचे काम रखडले होते. या दुरुस्तीच्या कामात दगडांची झीज, खांबांवरील तडे आणि मंडपाच्या छताची स्थिती यांचा अभ्यास करून योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मूळ वास्तूचे ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवून दुरुस्ती करणे हे या कामातील प्रमुख आव्हान असेल.
'पुढारी'चा सातत्याने पाठपुरावा...
दैनिक 'पुढारा'ने 'पाताळेश्वरचा नंदी मंडप जराजर्जर' हे वृत्त प्रथम २०२३ मध्ये प्रसिद्ध करत या प्रकाराला वाचा फोडली होती. केंद्रीय पुरातत्व विभागाने याची दखल घेतली. त्यानंतर सातत्याने नंदी मंडपाच्या डागडुजीच्या कामाचा पाठपुरावा घेतला. १० एप्रिल २०२६ रोजी नंदी मंडपाची डागडुजी याच वर्षात होणार या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. ७ मार्च २०२६ रोजी लेणीत क्यूआर कोड बसण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुंबईतील उपअधीक्षक संजय मंडले, अधिकारी रविराज, बाबासाहेब जंगले, पाताळेश्वरचे प्रमुख गजानन मंडवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी ६० लाखांचे बजेट मंजूर झाल्याची माहिती दिली होती.
६० लाखांचे बजेट मंजूर...
या कमासाठी सुमारे ६० लाखांचे बजेट मुंबई मुख्यालयाने मंजूर केले आहे. खांबावर पडणाऱ्या छताच्या भाराचे अभियांत्रिकी पद्धतीने गणित करून त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. या नंदी मंडपाची डागडुजी या आधी १९५० मध्ये झाल्याची नोंद आहे.