Shravan Wild Vegetables Pudhari
पुणे

Shravan Wild Vegetables: श्रावणातील रानभाज्यांची पुणेकरांना भुरळ; करटुली, हादग्याच्या फुलांना चांगला भाव

कमी आवक आणि वाढती मागणी; करटुली २५० रुपये किलो, हादग्याची फुले २०० रुपयांवर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कधी ऊन, कधी पावसाच्या सरी... हिरवाईने नटलेली सृष्टी आणि रानावनात आपोआप उगवलेल्या चवदार भाज्या, हे श्रावणाचे खास वैशिष्ट्य. वर्षातून अवघ्या काही दिवसांसाठी उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्यांची चव चाखण्यासाठी पुणेकरांची पावले आता बाजाराकडे वळू लागली आहेत. करटुली, शेवग्याची फुले व पाने, हादग्याची फुले, चिलाची भाजी आणि हिरवा माठ अशा रानभाज्यांनी बाजारात हजेरी लावली असून, मर्यादित आवक आणि वाढत्या मागणीमुळे त्यांना चांगला भाव मिळत आहे.

पावसाच्या सरी बरसल्यानंतर माळरान, शेताचे बांध, ओसाड जागा तसेच रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात. विशेष म्हणजे, या भाज्यांसाठी स्वतंत्रपणे खत अथवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गाकडून मिळणारी ही एक प्रकारची 'सेंद्रिय भेट'च मानली जाते. पूर्वी ग्रामीण भागातील आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या या भाज्या आता शहरातील ग्राहकांनाही आकर्षित करत आहेत. रानभाज्यांना केवळ वेगळी चव असल्यानेच नव्हे, तर पारंपरिकरीत्या त्यांना पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या मानले जात असल्यानेही मागणी आहे. अनेक पिढ्यांपासून श्रावणातील देवाच्या नैवेद्यापासून ते रोजच्या जेवणापर्यंत त्यांचा वापर होत आला आहे. बदलत्या खाद्यसंस्कृतीतही या पारंपरिक भाज्यांचे स्थान टिकून असल्याचे बाजारातील मागणीवरून दिसते. मात्र, नियमित भाज्यांच्या तुलनेत आवक अत्यल्प असल्याने रानभाज्यांचे दर काहीसे चढे आहेत.

हादग्याची फुले; किलोला २०० रुपये

शेतात किंवा बांधावर हादग्याची झाडे लावली जातात. त्याची फुले लंबगोलाकार व आकाराने मोठी असून पिवळट-पांढऱ्या किंवा लालसर रंगाची असतात. चवीला किंचित कडवट आणि तुरट असलेल्या फुलांची तसेच शेंगांची भाजी केली जाते. बाजारात हादग्याच्या फुलांची सुमारे २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

कारल्यासारखी दिसणारी करटुली

वेलवर्गीय वनस्पतीवर येणारी करटुली दिसायला छोट्या कारल्यासारखी असते. जून ते ऑगस्ट या कालावधीत प्रामुख्याने ती उपलब्ध होते. सुरुवातीला वेलीला फुले येतात आणि त्यानंतर फळे तयार होतात. बाजारात करटुलीला चांगली मागणी असून २०० ते २५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

शेवग्याची फुले अन् पानांनाही मागणी

शेवग्याची पांढरीशुभ्र, मध्यभागी पिवळसर छटा असलेली फुले तसेच पानेही भाजीसाठी वापरली जातात. फुलांची ५० रुपयांना पावशेर, तर पानांची ५० रुपयांना जुडी विकली जात आहे. वाऱ्यामुळे अथवा शेंगा काढताना तुटलेल्या फांद्यांवरील पाने आणि फुलेही गोळा करून बाजारात विक्रीसाठी आणली जातात.

'चंदन बटवा'अर्थात चिलाची भाजी

चिलाच्या भाजीला 'चंदन बटवा' म्हणूनही ओळखले जाते. कोवळे शेंडे आणि पाने खुडून तिची भाजी केली जाते. गुलाबाच्या पानाप्रमाणे काप असलेली आणि तुऱ्यासारखी दिसणारी पाने हे या भाजीचे वैशिष्ट्य आहे. बाजारात चिलाच्या भाजीची ५० रुपये प्रतिजुडी दराने विक्री सुरू आहे.

नैवेद्यातील हिरवा माठ

पावसाळ्यात ओसाड जमीन, रस्त्यांच्या कडेला तसेच शेतात नैसर्गिकरीत्या उगवणारा हिरवा माठ श्रावणात विशेष महत्त्वाचा मानला जातो. देवाला आवडणारी भाजी अशी पारंपरिक धारणा असल्याने नैवेद्यासाठीही तिचा आवर्जून वापर केला जातो. कोवळी पाने आणि फांद्यांची भाजी केली जाते. बाजारात हिरव्या माठाची ५० ते ६० रुपये प्रतिजुडी दराने विक्री होत आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार रानभाज्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. या भाज्या पौष्टिक असून त्यांच्यात औषधी गुणधर्म असल्याच्या पारंपरिक समजुतीमुळे ग्राहकांकडून चांगली मागणी असते. इतर भाज्यांच्या तुलनेत रानभाज्यांची आवक कमी असल्याने त्यांचे दरही काहीसे जास्त असतात.
चरण वणवे, भाजी विक्रेते, शनिपार चौक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT