Chinese Manja Ban: बारामतीत चायनीज मांजाचा सुळसुळाट; नागरिकांच्या जीवाला धोका

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त कारवाईची मागणी
Chinese Manja Ban
Chinese Manja BanPudhari
Published on
Updated on

बारामती: नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात पतंग उडविण्यासाठी चायनीज मांजाचा वापर केला जात असून, धारदार आणि जीवघेणा असलेल्या या मांजामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. दर वर्षी या मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी, तसेच पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे 'चायनीज मांजा नको, नागरिकांचा जीव वाचवा' अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

नागपंचमीच्या काळात पतंगबाजी केली जाते. त्यासाठी विविध प्रकारचा मांजा बाजारात उपलब्ध झाला आहे. मात्र, चायनीज मांजा अत्यंत धारदार असल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला, हाताला किंवा चेहऱ्याला गंभीर दुखापत होते.

Chinese Manja Ban
Gunjavani Dam water storage: गुंजवणी धरणात ९० टक्के पाणीसाठा; तोरणा खोऱ्यात रिमझिम सुरूच

अनेक वेळा रस्त्यावर आडवा आलेला मांजा वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने अपघात होतात. तसेच, विजेच्या तारांमध्ये मांजा अडकल्यास विद्युत अपघाताचा धोकाही वाढतो.

सध्या बारामती शहरातील विविध भागांमध्ये पतंग व मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली आहे. यामध्ये प्रतिबंधित चायनीज मांजाची विक्री होत आहे का? याची तपासणी करण्याची गरज आहे.

नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे बाजारपेठेत तपासणी मोहीम राबवून चायनीज मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना कडक तंबी द्यावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Chinese Manja Ban
Revenue Officials Transfer: अधिकाऱ्यांकडून गैरवापर; शिक्षा फक्त बदली!महसूल संहितेतील १५५ कलमाबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जात असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीच्या व मध्यवर्ती ठिकाणी पतंग उडविण्यावर प्रशासनाने निर्बंध घालणे आवश्यक आहे.

तसेच शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या परिसरात पतंग उडविण्यास प्रतिबंध करण्याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. बारामतीकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने चायनीज मांजाची विक्री व वापर रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा बारामतीकर व्यक्त करीत आहेत.

...अन्यथा पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल

चायनिज मांजा विक्री करणाऱ्या दुकानांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. विक्री करणारे व वापर करणारे या दोघांवरही याबाबत कारवाई केली जाईल. पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता २७९ अन्वये कारवाई झाल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखापर्यंत दंड होतो. त्यामुळे अशा मांजाची कोणी विक्री करू नये, कोणी तो वापरू नये, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news