पुणे: शहरात गुरुवारी प्रचंड गर्दीमुळे हवेची गुणवत्ता गंभीर गटात गेली होती. सर्वच रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाल्याने हवेची गुणवत्ता खराब झाली. प्रामुख्याने शिवाजीनगर, कर्वे रस्ता, चिंचवड, हडपसर भागातील हवेचे प्रदूषण टिपेला गेले होते.
सूक्ष्म व अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाणही दररोजपेक्षा दुप्पटीने वाढले होते. हवेची सरासरी गुणवत्ता 120 ते 150 वरून तब्बल 221 वर गेली होती.
डिसेंबर महिना सुरू झाला तशी शहरातील हवेची गुणवत्ता बिघडत आहे. गुरुवारी शहरातील प्रदूषणाने यंदाच्या हंगामात विक्रम नोंदवला. चिंचवड भागातील हवेची गुणवत्ता (एक्यूआय) तब्बल 242 मायक्रोग््रॉम प्रति चौ. मी. इतकी नोंदली गेली. त्यापाठोपाठ शिवाजीनगर, हडपसर, कर्वे रस्ता भगतील हवादेखील खूप खराब गटात नोंदली गेली.
अशी आहेत मानांकने
हवेची गुणवत्ता ही शून्य ते 50 शुद्ध, 51 ते 100 मध्यम, 101 ते 200 खराब, 201 ते 300 गंभीर, तर 300 च्या पुढे घातक प्रकारात गणली जाते. यात भारतीय आणि जागतिक मानांकने वेगवेगळी असली तरी पुण्यात येताना विदेशी पर्यटक जागतिक मानांकने बघूनच पर्यटनाला येतो. त्यामुळे जागतिक मानांकने डावलून चालणार नाही. गुरुवारी ही दोन्ही मानांकने तोडत शहराची हवा खराब, अतिखराब आणि गंभीर गटांत गणली गेली.
अतिसूक्ष्म, सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण खूप वाढले
गुरुवारी शहरातील अतिसूक्ष्म धुलीकण (पीएम 2.5 ) चे प्रमाण 142 वर गेले होते, जे सरासरी 46 ते 50 च्या आसपास असते. तर सूक्ष्म धुलीकणांचे (पी.एम.10) चे प्रमाण 175 वर गेले, जे दररोज सरासरी 80 ते 100 मायक्रो ग््रॉम प्रति चौ.मी.इतके असते. मात्र गुरुवारी झालेली गर्दी, वाहनकोंडी यामुळे वाहन इंधन ज्वलनातून निघणारे धुलीकणांचे प्रमाण जवळजवळ दुप्पटीने जास्त होते.