Mid Day Meal Shortage Pudhari
पुणे

Pune School Mid Day Meal Rice Supply: पुणे जिल्ह्यात शालेय पोषण आहार संकटात; जूनपासून तांदूळ नाही, ७.४० लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर

पुरवठा करार रखडल्याने शाळांची अडचण वाढली; शिल्लक साठा संपल्याने शिक्षक प्रशासन चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: शालेय पोषण आहारासाठी आवश्यक असलेला तांदूळ शाळा सुरू झाल्यापासून म्हणजेच जून महिन्यापासून उपलब्ध झालेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ३ हजार ५०० शाळांमधील २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील मिळून जवळपास ७ लाख ४० हजार विद्यार्थी शालेय पोषण आहाराचा लाभ घेतात. अनेक शाळांकडे असलेला शिल्लक तांदूळ संपला असून, काही शाळांनी उसनवारीने घेतलेला तांदूळही संपल्याने शिक्षक व शाळा प्रशासनापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शालेय पोषण आहाराचा पुरवठा साधारणपणे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर केला जातो. वर्षभरात सुमारे पाच वेळा पोषण आहाराचा पुरवठा होणे अपेक्षित असते. मात्र, यंदा पुरवठा रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना आहार देताना शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या संबंधित विभागाकडून पुणे जिल्हा कार्यालयाचा करारनामा झाल्यानंतर शाळांना पुरवठा आदेश दिला जातो. मात्र, अद्याप हा करारनामा झालेला नसल्याने पोषण आहाराचा पुरवठा रखडल्याची माहिती समोर आली आहे. १५ जूनपर्यंत पुरवठा होणे अपेक्षित असताना दीड महिन्यापासून हा प्रश्न प्रलंबित आहे.

दौंड तालुक्यात ३६६ शाळांमधील ३६ हजारांहून अधिक विद्यार्थी....

दौंड तालुक्यात शालेय पोषण आहारासाठी ३६६ शाळा पात्र आहेत. या शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत २२ हजार १७४ विद्यार्थी, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १३ हजार ९६७ विद्यार्थी पोषण आहाराचा लाभ घेतात. मात्र, पोषण आहाराचा पुरवठा रखडल्याने या विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दौंड तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात पोषण आहाराचा पुरवठा सुरू झाला होता. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उपलब्ध साठा संपला. त्यानंतर नवीन पुरवठा वेळेत न झाल्याने शाळांनी उपलब्ध शिल्लक साठ्यावर तसेच काही ठिकाणी उसनवारीवर काम भागविले. आता हा साठाही संपल्याने शाळांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मुंढेंचा धसका

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नातील भेसळीवर सुरू केलेल्या कारवाईची धास्ती शाळांना तांदूळ पुरवणाऱ्या ठेकेदारांनी घेतली असल्याचे समजते त्यामुळे तांदूळ पुरवठा करण्यास ते कचरत आहेत कारण बहुसंख्य ठिकाणी हा तांदूळ अतिशय निकृष्ट दर्जाचा असतो निविदेमध्ये मान्य केलेल्या बाबीनुसार नसतो असे अनेक वेळा दिसून आले आहे परंतु त्या वेळेला कारवाई झालेली नाही आता तुकाराम मुंढे यांच्यामुळे थेट कारवाई होऊ शकते याची धास्ती या ठेकेदारांनी घेतली असल्याने तांदळाचे वाटप रखडले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते

शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि पोषणाशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. पुणे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत असताना तांदळाचा पुरवठा रखडणे ही गंभीर बाब आहे. जून महिन्यापासून तांदूळ उपलब्ध नसल्याने शाळांकडील शिल्लक साठा संपला आहे. काही शाळांनी उसनवारीने घेतलेला तांदूळही आता संपला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने शालेय पोषण आहाराचा पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
नंदकुमार होळकर (महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT