

पुणे: खडकवासला धरण साखळीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद केला.
खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळनंतर संततधार पाऊस झाला. परिणामी, धरणातून पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी दुपारी विसर्ग वाढवण्यात आला. त्यानंतर नदीपात्रातील रस्ता तसेच बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला.
नदीपात्रातील रस्त्याचा वापर नारायण पेठ, शनिवार पेठ, तसेच कोथरूडकडे जाणारे वाहन चालक करतात. नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. त्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.
नदीपात्राकडे जाणारे रस्ते वाहतूक पोलिसांनी लोखंडी कठडे टाकून बंद केले. नदीपात्रातील रस्त्याचा वापर वाहनचालकांनी करू नये. पाणी ओसरल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला करून दिला जाईल, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.