पुणे: राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत 57 हजार 135 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. एक लाख जागांपैकी निम्मेच प्रवेश झाल्यामुळे आणि प्रवेशासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना प्रशासकीय हलगर्जीपणामुळे मुलांचे प्रवेश निश्चित न झाल्यामुळे पालक हवालदिल झाले आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील आठ हजार 701 शाळांमध्ये एकूण एक लाख 14 हजार 826 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी दोन लाख 89 हजार 286 अर्ज दाखल झाले आहेत.
तर, रविवारी सायंकाळपर्यंत राज्यात 57 हजार 135 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची निवड यादीत नावे आली आहेत, त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शाळांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अपेक्षित प्रवेश न झाल्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
प्रवेशप्रक्रिया दृष्टिक्षेपात
प्रवेशाची शेवटची तारीख: 30 एप्रिल
शाळा: 8,701
अर्जनोंदणी: 2,89,286
प्रवेशासाठी उपलब्ध जागा: 114826
विद्यार्थ्यांची निवड: 1,05,811
प्रतीक्षा यादी: 86,034
विद्यार्थी प्रवेश: 57135
अधिकाऱ्यांच्या घरभेटीमुळे पालक हतबल
आरटीई प्रवेशासाठी नाव निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरांची अधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी करण्यात येते. परंतु, त्यामुळे पालकांना काम सोडून घरीच थांबावे लागत आहे. जर पालक घरी नसले तर अधिकारी पुन्हा कधी येणार? हे कोणीही सांगायला तयार होत नाही. त्यामुळे मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.