Arrested Pudhari
पुणे

Pune Robbery Accused Arrested: गोळीबार करून २२ तोळे सोने लुटणारे तिघे उज्जैनमध्ये जेरबंद

पुणे पोलिसांची २४ तासांत कारवाई; तीन गावठी पिस्तुले व सोन्याचे दागिने जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: व्यावसायिकावर गोळीबार करत २२ तोळे सोन्याचे दागिने लुटून फरार झालेल्या कुख्यात तीन दरोडेखोरांना पुणे पोलिसांनी चोवीस तासांच्या आता मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने मध्य प्रदेशातील उज्जैनमधून पकडले. शुक्रवारी (दि.७) त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेली तीन गावठी पिस्तुले, सोन्याचे दागिने देखील त्यांच्याकडून जप्त केले आहेत.

अविनाश श्रीकृष्णचंद्र त्रिपाठी, मोहम्मद वसीम शोएब, सुरेंद्र रामचंद्र पाल अशी तिघा दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्यावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तसेच नेपाळमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, गँगस्टर कायद्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. हे तिघे आरोपी पाच, सहा महिन्यांपासून बकोरी परिसरात वास्तव्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश त्रिपाठी आणि त्याच्या साथीदारांनी बुधवारी (दि.५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गावडेवाडी, शिरसवाडी परिसरात व्यावसायिक संतोष गावडे यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या गळ्यातील २२ तोळे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी, लोणीकंद पोलिस ठाण्यात तिघा आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत होती. सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीपैकी एकाची माहिती मिळाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीवरून जात असताना तो कैद झाला होता. मात्र, ती दुचाकी चोरीची होती. पोलिसांनी त्या गाडीवरील ट्राफिक चलान तपासले असता, त्यांच्याहाती आरोपीचा फोटो लागला. त्याच्या शर्टवरून त्याची ओळख पटवली. तेव्हा हा आरोपी बकोरी परिसरात राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचे घर शोधून काढले. मात्र, तोपर्यंत तेथून त्यांनी पळ काढला होता. त्या ठिकाणी पोलिसांना आरोपीपैकी एकाचे आधारकार्ड हाती लागले.

आरोपीच्या बायकोने एका ठिकाणी फोन पेद्वारे पैसे दिले होते. त्यावरून पोलिसांना एक मोबाईल क्रमांक मिळून आला. तांत्रिक विश्लेषणात आरोपी मध्य प्रदेशात पोहचल्याचे पोलिसांना समजले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन, अबिनाश कुमार यांनी तत्काळ मध्य प्रदेश पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी धार, इंदौर ग्रामीण, इंदौर शहर अशा ठिकाणी सापळा लावला. मात्र, त्यांची मोटार काही मिळून आली नाही. त्याच वेळी पोलिसांना आरोपींनी एका कॅबमधून शिरूरपर्यंत प्रवास केल्याचे समजले. त्यानंतर ती कॅब त्यांनी सोडून दिली होती. अखेर पोलिसांनी ट्रॅव्हलस्‌ची तपासणी केली. त्या वेळी हे आरोपी त्यांना उज्जैनमध्ये मिळून आले. उज्जैन पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पुणे शहर पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर होतीच. काही तासांत ते उज्जैनमध्ये पोहोचले. शुक्रवारी (दि.७) तिघा आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

त्रिपाठीची गुन्हेगारी कुंडली

  • उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून २०१४ मध्ये पलायन.

  • उत्तर प्रदेशात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसह १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद.

  • पुण्यात २४ डिसेंबर २०१४ रोजी कोरेगाव पार्क येथील सराफ दुकानातून १.४२ कोटींच्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांची लूट.

  • हडपसरमधील सराफ दुकानातून ४० लाखांचे दागिने लुटल्याचा आरोप.

  • २०१५ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे ६० लाखांच्या सराफ दुकान दरोड्याचा सूत्रधार.

  • २०१७ मध्ये नेपाळमधील घनगडी परिसरात दोन किलो सोन्याची लूट.

  • शिक्रापूरमध्ये गोळीबार करून साखळी चोरी केल्याचाही आरोप.

  • भारत आणि नेपाळमध्ये सक्रिय असलेल्या आंतरराज्यीय दरोडा टोळीचा प्रमुख म्हणून ओळख.

  • एप्रिल २०१८ मध्ये उत्तर प्रदेश एसटीएफने लखनऊ येथे चकमकीनंतर अविनाशचंद्र त्रिपाठीला जेरबंद केले.

  • त्याच्या अटकेसाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

चोवीस तासांच्या आत पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना पकडले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तुले, हिसकावलेला ऐवज जप्त केला आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT