Road Tender Controversy Pudhari
पुणे

Pune Road Repair Tender: ८७ किमी रस्त्यांच्या पुनर्दुरुस्तीसाठी ११५ कोटींची तरतूद; पुणे महापालिकेच्या नियोजनावर गंभीर प्रश्न

३० कोटींत होणाऱ्या कामासाठी ११५ कोटींचे टेंडर काढल्याचा आरोप; इस्टिमेट कमिटीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील रस्ते खोदाईनंतरच्या पुनर्दुरुस्तीसाठी महापालिकेने केलेल्या नियोजनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुमारे ३० कोटी रुपयांत होऊ शकणाऱ्या ८७ किलोमीटर रस्त्यांच्या कामासाठी तब्बल ११५ कोटी रुपयांची तरतूद आणि टेंडर काढल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे. या प्रकरणातील इस्टिमेट कमिटीच्या कामकाजाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले असून, आठ दिवसांत चौकशी समिती नियुक्त न केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा तसेच गरज पडल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेने ८७ किलोमीटर रस्ते खोदण्यास परवानगी दिली आहे.

त्यांच्या पुनर्दुरुस्तीसाठी क्षेत्रीय कार्यालयांना यापूर्वी सुमारे ४० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर मुख्य खात्यामार्फत ७५ कोटी रुपयांचे स्वतंत्र टेंडर काढल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे एकाच कामासाठी ११५ कोटींची तरतूद कशासाठी, असा सवाल उपस्थित केला आहे.

तक्रारदारांनी कामाच्या दरांचा आधार घेत ८७ किलोमीटर रस्त्यांच्या पुनर्दुरुस्तीचा खर्च सुमारे २५ कोटी ९२ लाख रुपये, तर १८ टक्के जीएसटीसह सुमारे ३० कोटी ५८ लाख रुपये होतो, असा दावा केला आहे.

१२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते क्षेत्रीय कार्यालयांमार्फत दुरुस्त करण्याचे परिपत्रक असतानाही मुख्य खात्याकडून ७५ कोटींचे टेंडर काढल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ८७ किलोमीटरपैकी किती रस्ते क्षेत्रीय कार्यालयांकडे आणि किती मुख्य खात्याकडे आहेत, याचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT