Road Accident Pudhari
पुणे

Pune Road Accidents: पुण्यात रस्ते अपघातांचा कहर! दहा महिन्यांत २६३ जणांचा मृत्यू

विनाहेल्मेट ११४ जणांचा बळी; गतवर्षाच्या तुलनेत मृत्यूंच्या संख्येत ३८ ने वाढ, दोन भीषण अपघातांत सहा तरुणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र कांबळे

पुणे: घरातून कामावर जाण्यासाठी निघालेला माणूस सुखरूप परत येईल की नाही, याची शाश्वती पुण्याच्या रस्त्यांवर राहिलेली नाही. एखाद्या अपघातात व्यक्तीचा जीव जातो. मात्र, त्याच क्षणी संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपतो. कुणाची स्वप्ने अर्धवट राहतात, तर कुणाच्या डोक्यावरील छत्र कायमचे हरवते. शहर वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत शहरात २५८ भीषण अपघात झाले असून, त्यात तब्बल २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ नोव्‍हेंबर २०२६ अखेर मृत्‍यूसह अपघाताचा आकडा २८० च्‍या वर गेल्‍याची माहिती आहे.

हेल्मेटचा कंटाळा जिवावर बेतला

अपघातांच्या कारणांचे विश्लेषण करता विनाहेल्मेट दुचाकी चालवणे जीवघेणे ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विनाहेल्मेट ११४ जणांचा मृत्यू झाला. महामार्गावर पादचाऱ्यांना धडक बसल्याच्या ४० घटना घडल्या. स्वतःच्या चुकीमुळे १७, तर अन्य कारणांमुळे १४ अपघात झाले. अवजड वाहनांच्या धडकेतही अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. टेम्पोमुळे सर्वाधिक ४१, कारमुळे २१, डम्परमुळे २०, ट्रॅक्टरमुळे १३, पीएमपी बसमुळे १०, सिमेंट मिक्सरमुळे सात आणि पीकअपमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

कामावर जाताना, घरी परततानाही धोका

जानेवारी ते सप्टेंबरमधील २४३ अपघातांच्या वेळेचे विश्लेषण धक्कादायक आहे. सकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक ३५, तर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ३४ अपघात झाले. दुपारी ३ ते ६ आणि मध्यरात्री १२ ते पहाटे ३ या वेळेत प्रत्येकी ३१ अपघात घडले. सकाळी ९ ते १२ या वेळेत २९, दुपारी १२ ते ३ आणि रात्री ९ ते १२ या वेळेत प्रत्येकी २८, तर पहाटे ३ ते ६ या वेळेत २७ अपघात झाले. म्हणजेच दिवस-रात्र रस्त्यांवरील धोका कायम आहे.

गतवर्षाच्या तुलनेत मृत्यूंत ३८ ने वाढ

२०२३ मध्ये ३३४ अपघातांत ३५१, तर २०२४ मध्ये ३३४ अपघातांत ३४५ जणांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये वर्षभरात २८७ अपघातांत ३०२ जणांचा बळी गेला. गतवर्षीच्या पहिल्या दहा महिन्यांत २४८ अपघातांत २२५ मृत्यू झाले होते. यंदा अपघातांची संख्या १० ने, तर मृत्यूंची संख्या ३८ ने वाढली आहे. मार्चमध्ये सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला.

हेल्मेटचा वापर आणि वेगावर नियंत्रण गरजेचे

प्रत्येक अपघातामागे एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे हेल्मेटसक्ती, वेगमर्यादेची अंमलबजावणी, अवजड वाहनांवर नियंत्रण, धोकादायक चौकांचे सुरक्षितीकरण आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग निर्माण करणे अत्यावश्यक आहे. अपघातानंतर मदत करण्यापेक्षा अपघातच रोखण्याची वेळ आली आहे. रस्ते अपघातातील प्रत्येक मृत्यू ही केवळ आकडेवारी नसून, एका कुटुंबाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर आणि वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कारण, रस्त्यावर जाणारा प्रत्येक जीव सुखरूप घरी परतणे, हीच खरी सुरक्षित पुण्याची ओळख ठरली पाहिजे.

एका आठवड्यात दोन भीषण अपघात; सहा तरुणांचा बळी

अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने पुण्यात दोन भीषण अपघात घडले. २३ नोव्हेंबरला पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाघोलीत भरधाव कारने टेम्पो आणि ट्रकला धडक दिल्याने तीन तरुणांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर २५ नोव्हेंबरला बोपदेव घाटात भरधाव आयशर टेम्पो विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. यात ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. दोन दुर्घटनांत सहा तरुणांचा बळी गेल्याने पुण्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT