

पुणे: कॅम्प परिसरातील १५ ऑगस्ट चौकाजवळ युनियन बँकेसमोर तीन संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने शुक्रवारी (दि. २७) सकाळी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने तपासणी केली असता या बॅगमध्ये कोणतीही बॉम्बसदृश किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
शुक्रवारी सकाळी १० वाजून ४६ मिनिटांनी पोलिस नियंत्रण कक्षाला युनियन बँकेसमोर तीन संशयास्पद बॅग पडल्याची माहिती बँकेच्या एका कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली. त्यानुसार लष्कर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक गर्कल, उपनिरीक्षक वाघमारे यांच्यासह बीट मार्शल आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.
बीडीडीएस पथक क्रमांक १ चे अधिकारी व कर्मचारी श्वान ध्रुव याच्यासह सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाले. श्वान ध्रुव, बॉम्बसूट तसेच एनएलजेडी आणि एम/आयओएन या उपकरणांच्या साहाय्याने बॅगांची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये बॉम्बसदृश वस्तू नसल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने तिन्ही बॅगा बीडीडीएसच्या वाहनातून गोळीबार मैदान येथे नेण्यात आल्या. तेथे प्रमाणित कार्यपद्धतीनुसार पंचांसमक्ष बॅगा उघडण्यात आल्या. पहिल्या काळ्या फायबर बॅगेत काहीही आढळले नाही. दुसऱ्या बॅगेत पडदा, दोन चादरी, एक बेडशीट आणि जुने गुलाबी रंगाचे महिलांचे जॅकेट मिळाले.
तिसऱ्या कॅनव्हास बॅगेत दोन स्टेपलर, पिनची १६ पाकिटे, दोन रबर स्पॅनर, वापरून फेकून देण्याच्या प्रकारातील दोन बूट आणि पाच डायनिंग मॅट आढळून आले. सहायक पोलिस आयुक्त शुभदा संखे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनीही घटनास्थळी भेट दिली.