

पुणे: राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड मिळणार आहे. गावांचा सर्वांगीण विकास करण्यासह ग्रामीण नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील ७५ गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाच्या पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
राज्य शासनाच्या ग्राम विकास विभगाच्या वतीने हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेतून पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील गावपातळीवरील विविध विकासकामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्ता तपासणी अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, या प्रकल्पाची तांत्रिक गुणवत्ता, व्यवहार्यता निश्चित करण्याबरोबरच प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राज्यातील प्रमुख शासकीय अभियांत्रिकी संस्थांवर सोपवली आहे.
या संस्थांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी ‘तांत्रिक सहाय्य संस्था’ (टीएपी) म्हणून निवड केली आहे. त्यामुळे प्रकल्प केवळ कागदावर न राहता त्याची तांत्रिक बाजू सक्षम करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारली आहे. ग्रामविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार ७५ गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ग्रामविकासाचा पथदर्शी प्रयोग राबविण्याची प्रक्रिया निश्चित केली आहे.
या प्रयोगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कितपत उपयुक्त ठरतो, त्याची अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणी येतात आणि त्यावर कोणते उपाय करता येतील, याची पडताळणी केली जाणार आहे. निवड केलेल्या शासकीय अभियांत्रिकी संस्थांकडून प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार आहे. तसेच, प्रस्तावित तंत्रज्ञानाची गुणवत्ता, त्याची प्रत्यक्ष गावांमध्ये वापरण्याची व्यवहार्यता आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन या संस्थांकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत या संस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाच्या तांत्रिक कामकाजाला दिशा देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील ७५ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रयोगातून मिळणारे अनुभव आणि निष्कर्ष भविष्यातील ग्रामविकासाच्या धोरणांसाठी उपयुक्त ठरू शकतात. विशेषतः ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि गावांच्या गरजांनुसार विकासाचे नियोजन करणे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.