JCB Pudhari
पुणे

Pune RMC Plant Action Stalled: बेकायदा RMC प्लांटवरची कारवाई फोल; ‘विभीषण’ अधिकाऱ्याने दिली टिप

वडगाव-धायरी कारवाई ऐनवेळी थांबली; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: लोहगाव आणि खांदवेनगर येथील बेकायदा रेडीमिक्स सिमेंट (आरएमसी) प्लांटवर धडाकेबाज कारवाई केल्यानंतर, महापालिकेचा बुलडोझर वडगाव आणि धायरी परिसरातील नऊ प्लांटवर चालणार होता. मात्र, मनपातील एक वरिष्ठ अधिकारी फुटल्याने ही मोहीम अखेरच्या क्षणी फोल ठरली. कारवाईचे नियोजन सुरू असतानाच या ‌‘फुटीर‌’ अधिकाऱ्याने प्लांट चालकांना टिप देत वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवून कारवाई थांबवण्यात आली.

आरएमसी प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्याने आयुक्तांनी शहरातील सर्व बेकायदा आरएमसी प्रकल्पांवर कारवाईचे आदेश दिले होते. बांधकाम विभागाने धायरी आणि वडगाव येथील नऊ बेकायदा प्लांटवर कारवाईचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार शुक्रवारी (दि. 17) पहाटे कारवाईचे नियोजन अंतिम झाले. दरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्लांटचालकांना याची गुप्त माहिती पुरवली.

बांधकाम विभाग‌ ‘वेट अँड वॉच‌’मध्ये

एकीकडे बेकायदा प्लांटची यादी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवण्यात आली आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष कारवाईसाठी बांधकाम विभाग गोंधळात पडला आहे. लोहगावच्या कारवाईनंतर बांधकाम विभागाने ही जबाबदारी अतिक्रमण विभागाकडे ढकलली. मात्र, तिथेच फुटीर अधिकाऱ्याने खो घातल्याने आता पुढे काय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वडगाव-धायरी येथील आरएमसी प्लांटवर कारवाईचे नियोजन सुरू असताना मला अचानक ‌‘कारवाई करू नये‌’ असे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे ही मोहीम रद्द करावी लागली.
सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग
लोहगाव येथील कारवाईचे आदेश मी स्वतः दिले होते. मात्र, वडगाव-धायरी येथे कारवाई होणार होती, याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे ती का थांबली, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल माहिती घेतली जाईल. जे प्लांट बेकायदा आहेत, त्यांच्यावर कारवाई निश्चितच होईल.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT