

पुणे: नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतिबंधास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. सुधारित आकृतिबंधानुसार सध्या मंजूर पदांची संख्या 3 हजार 952 झाली आहे. विभागाच्या सध्या 3 हजार 94 पदांपैकी 107 पदे रद्द करण्यात आली असून, आणखी नव्याने 965 पदे नव्याने निर्माण करून ही संख्या एकूण 3 हजार 952 पदांवर नेण्यात आली आहे.
या सुधारित आकृतिबंधास 4 डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य सरकारला महसूल प्राप्त करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा विभाग आहे. विभागाची नवीन आकृतिबंधाची मागणी 2016 पासून प्रलंबित होती. विभागातील नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांच्या निर्मिती यामुळे विभाग अधिक सक्षम होईल.
शासनाच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा
राज्य शासनाने नवीन आकृतिबंधास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आणखी कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या वाढली आहेच, शिवाय राज्यात नवीन दस्तनोंदणी कार्यालयांची संख्या वाढणार आहे. या पूर्वी अपुरे मनुष्यबळामुळे कमी महसूल जमा होत असे, आता मात्र महसुलात घसघसीत वाढ होण्याच्या संधी आहेत. पर्यायाने अधिक चांगल्या सेवा देण्याचा शासनाचा व विभागाचा मानस सफल होण्यास यामुळे मदत होणार आहे, असे बिनवडे यांनी सांगितले.