CCTV Camera Pudhari
पुणे

Pune River CCTV Flood Monitoring: पुण्यात पूरनियंत्रणासाठी नदीपात्रांवर CCTV; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

168 ठिकाणी कॅमेरे बसवून 24 तास नजर; आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा महापालिकेचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत नदीपात्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत शहरातील नदीपात्रांतील घडामोडींवर 24 तास लक्ष ठेवले जाणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पावसाळ्यात मुळा-मुठा नद्यांसह शहरातील विविध ओढ्यांना येणाऱ्या पुरामुळे अनेक भागांत पाणी साचून मोठे नुकसान होते. खडकवासला धरणातून पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतील पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकिनारी असलेल्या भागांवर पुराचा तत्काळ परिणाम होतो. विशेषतः सिंहगड रस्ता परिसरात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षी एकतानगरीसह अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या वेळी वेळेवर माहिती आणि तातडीचा प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पर्जन्यमापक यंत्रे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियंत्रण कक्ष यांचा समन्वय साधून पूर्वसूचना प्रणाली बळकट करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

योजनेअंतर्गत शहरातील नदीपात्रांमध्ये एकूण 168 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यापैकी 44 ठिकाणी कॅमेरे सुरू झाले असून, आणखी 14 ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे. कॅमेरे अखंड सुरू राहावेत, यासाठी काही ठिकाणी सौरऊर्जेचा, तर काही ठिकाणी नियमित वीजपुरवठ्याचा वापर करण्यात येणार आहे. नदीपात्र परिसरात सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी विविध स्तरांतून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

राडारोडा टाकणाऱ्यांवर राहणार लक्ष

दोन महिन्यांपूर्वी टिळक पुलाजवळील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकामांचा राडारोडा टाकला होता. याप्रकरणी संबंधितांना दहा लाख दंडासह बांधकाम बंदची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे अशा घटनांना आळा ठेवता येणार आहे.

सीसीटीव्हीमुळे धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याची पातळी आणि संभाव्य पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. तसेच, नदीपात्रातील बेकायदेशीर हालचालींवरही नियंत्रण मिळवता येईल
गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT