Riksha Pudhari
पुणे

Pune Riksha Permit Ban 2026: पुण्यातील मुक्त रिक्षा परवाने बंदी: चालकांना दिलासा

गेल्या 9 वर्षांत सुरू असलेले मुक्त रिक्षा परवाने बंद; रिक्षाचालक आणि संघटनांनी राज्य शासनाचे आभार मानले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शासनाने सोमवारपासून (दि. 09) रिक्षा व टॅक्सी परवाने बंद केल्यामुळे पुण्यातील रिक्षाचालक आणि रिक्षा संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले, उशिरा का होईना, मुक्त परवाने बंद झाले, असे म्हणत पुण्यातील रिक्षाचालकांनी शासनाचे आभार मानले.

सलग 9 वर्षांपासून रिक्षा परवाने वाटप मुक्तपणे सुरू होते. परिणामी, शहरात रिक्षांची संख्या वाढल्यामुळे रिक्षा व्यवसायावर संक्रांत यायला सुरुवात झाली होती. अनेक रिक्षाचालकांचा पूरक असा धंदा होत नसल्याने त्यांनी याबाबत अनेकदा आंदोलने करून, निवेदने देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुक्त रिक्षा परवाने बंद करण्याची मागणी पुण्यासह राज्यातील रिक्षा संघटनांची होती. अखेर सोमवारी याबाबत निर्णय झाल्याने रिक्षाचालक आणि संघटनांनी व्यक्त केला. दरम्यान, याबाबत पुण्यातील रिक्षाचालक अनंता वीर, लहु ओंबळे, शंकर पानसरे, पोपट गंधाले, बाळू राजापुरे, मनोज मोहिते यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आणि शासनाचे आभार मानले.

शहरात रिक्षांची संख्या 1 लाख 42 हजार...

पुणे शहरासह राज्यभरात सुमारे गेली नऊ ते दहा वर्षांपासून सलग रिक्षा परवाने वाटप सुरू होते. यामुळे रिक्षांची संख्या प्रचंड वाढत होती. परिणामी, वाहतूक कोंडीसह रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत होता. अखेर हा मुक्त परवाना शासनाने बंद केला. तरीही पुण्यात सध्या 1 लाख 41 हजार 332 रिक्षा आहेत. मात्र, या रिक्षा लोकसंख्येच्या गणितानुसार आहेत की नाहीत, असा प्रश्न पुण्यातील रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

एक लाख लोकसंख्येमागे 800 रिक्षा, असे केंद्राचे गॅझेट असतानाही शासनाने लोकसंख्येच्या तीनपट परवाने सोडले. त्यामुळे आता अनेक रिक्षाचालकांच्या पोटावर पाय आले आहेत. मात्र, उशिरा का होईना, शासनाने, परिवहनमंत्र्यांनी परवाने बंद केले आहेत, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, पण असो शासनाचे आभार.
बापू भावे, रिक्षा फेडरेशनचे नेते
मुक्त रिक्षा परवाना बंद करा, ही मागणी रिक्षा पंचायत आणि राज्य रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने गेले दशकभर वारंवार करण्यात येत होती. त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. ही मागणी दीर्घकाळ प्रलंबित ठेवत शेवटी या भूमिकेवर आज शिक्कामोर्तब करत राज्य शासनाने रिक्षा परवाना बंदीचा निर्णय घेतला. आता तरी शहाणपण शिकून तात्पुरता रिक्षा परवाना बंद करतोय अशी भूमिका न घेता, रिक्षा परवाना बंदच ठेवण्याची आता राज्याच्या वाहतुकीच्या शिस्तीसाठी गरज आहे.
नितीन पवार, अध्यक्ष, रिक्षा पंचायत
राज्य सरकारने मुक्त परवाना बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. कारण गेली अनेक वर्षे शिवनेरी रिक्षा संघटनेकडून मुक्त परवाना बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात आली. जवळपास महिना दोन महिन्यांत एकदा मुंबई आयुक्त कार्यालयात जाऊन पाठपुरावा करण्यात आला. त्या लढ्यास यश मिळाले. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. सर्व रिक्षाचालकांचे अभिनंदन व राज्य सरकार व आयुक्त कार्यालयाचे आभार
आबा बाबर, संस्थापक, शिवनेरी रिक्षा संघटना
राज्यामध्ये नवीन रिक्षा परमिटचे खुले धोरण बंद करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून सातत्याने करत होतो. रिक्षांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे हजारो चालकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत होता. अनेक आंदोलने, निवेदने आणि सातत्यपूर्ण संघर्षानंतर अखेर सरकारने नवीन रिक्षा परमिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रिक्षाचालकांच्या लढ्याला मिळालेले मोठे यश असून, त्यामुळे चालकांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळण्यास मदत होईल.
केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT