नोंदणी विभागाचा ‌‘गुणांकन‌’ फॉर्म्युला यशस्वी Pudhari
पुणे

Registration Department Pune: नोंदणी विभागाचा ‌‘गुणांकन‌’ फॉर्म्युला यशस्वी

27 कार्यालयांच्या कामाला वेग; पाच कार्यालये ठरली ‌’टॉप परफॉर्मर‌’

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये अधिक गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने ‌‘गुणांकन पद्धत‌’ लागू केली आहे. या नव्या पद्धतीमुळे दस्त नोंदणी, स्कॅनिंग, ई-रजिस्ट्रेशन, ई-मोहोर आणि इतर कामकाजासाठी अधिकाऱ्यांना निश्चित वेळेची मर्यादा पाळणे बंधनकारक झाले.(Latest Pune News)

या प्रणालीअंतर्गत दुय्यम निबंधक यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये शहरातील सर्वच 27 कार्यालयांच्या कामकाजात गतिमानता आली आहे. मात्र प्राधान्याने शहरातील हवेली क्रमांक 7, क्रंमांक 10, क्रमांक 13, क्रमांक 21 आणि क्रमांक 21 या पाच कार्यालयांनी दस्त नोंदणी, स्कॅनिंग, ई-रजिस्ट्रेशन, ई-मोहोर यांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे.

याबाबत माहिती देताना मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निंबधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले की, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये होणाऱ्या विलंबाला आळा घालणे आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेला प्रोत्साहन देणे हा या गुणांकन पद्धतीचा मुख्य उद्देश होता.11 सप्टेंबर ते 7 आॉक्टोंबर या कालावधीत या 27 कार्यालयांतील कामांचे मूल्यमापन करण्यात आले.

या गुणांकन पध्दतीमध्ये जर नेमून दिलेली कामे मुदतीमध्ये पूर्ण न झाल्यास वजा गुण देण्याची तरतूद होती. मात्र सर्वच 27 कार्यालयांनी अधिक गुण मिळवले आहेत. यातील पाच कार्यालयांनी चांगले काम केल्याबद्दल या कार्यालयांना लवकरच स्वतंत्र प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. पुढील काळात सर्व कार्यालयांनी आपल्या कामकाजात सुधारणा करून गुणांकन वाढवावे आणि नागरिकांना जलद सेवा द्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.

उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक

शहरातील हवेली क्रमांक 7 च्या दुय्यम निबंधक रोहिणी भिल्लारे, क्रमांक 10 चे दुय्यम निबंधक तानाजी पाटील, हवेली क्रमांक 13 चे दुय्यम निबंधक विनोद कासेवाड, हवेली क्रमांक 21 चे दुय्यम निबंधक दिनकर देशमुख आणि हवेली क्रमांक 23 च्या दुय्यम निबंधक मीनल मोरे या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दस्त नोंदणी, स्कॅनिंग, ई-रजिस्ट्रेशन, ई-मोहोर यामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सह जिल्हा निबंधक हिंगाणे यांनी कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT