Leopard Attack | काळाने घात केला! बिबट्याच्या हल्ल्यात साडेपाच वर्षांच्या शिवन्याचा मृत्यू; पिंपरखेड हादरले

Leopard Attack | शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी (दि. १२) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे.
Leopard Attack
Leopard Attack Online Pudhari
Published on
Updated on

पिंपरखेड (जि. पुणे): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी (दि. १२) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. भरदिवसा बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या साडेपाच वर्षांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली असून, यामुळे संपूर्ण पिंपरखेड आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून, वनविभागाने या हिंस्त्र पशूचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leopard Attack
BJP Local Elections Strategy: स्वतंत्रपणे लढलो, तरी मित्रपक्षांसोबत मनभेद होईल अशी टीका करणार नाही

नेमकं काय घडलं?

पिंपरखेड येथील शेतकरी अरुण देवराम बोंबे यांच्या घरामागे त्यांच्या शेतात जेसीबीचे काम चालू होते. या कामाच्या ठिकाणी त्यांचे नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरुण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन जात होती. घरापासून जवळच असलेल्या एका चार फूट उंचीच्या ऊसाच्या शेतात एक बिबट्या दबा धरून बसला होता.

शिवन्या पाणी घेऊन जात असतानाच, दबा धरून बसलेल्या त्या बिबट्याने अचानक तिच्यावर जोरदार झडप घातली. बिबट्याने शिवन्याला तोंडात पकडले आणि तो तातडीने ऊसाच्या शेतात शिरला. सुमारे २०० फूट अंतरावर असलेल्या आजोबा अरुण देवराम बोंबे यांनी हा थरार पाहिला. आपल्या चिमुकल्या नातीवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहताच, क्षणाचाही विलंब न लावता ते जीवाच्या आकांताने बिबट्याच्या दिशेने धावले.

जीवाची पर्वा न करता अरुण बोंबे यांनी ऊसात शिरलेल्या बिबट्याच्या दिशेने धाव घेतली आणि मोठ्या हिंमतीने बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले.

Leopard Attack
Domestic Violence: पोटगी न भरणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका; कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश

उपचारापूर्वीच मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे बोंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. तसेच, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती घेऊन बोंबे कुटुंबाचे सांत्वन केले आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

परिसरातील सातवी घटना

पिंपरखेड आणि जांबूत या साधारण १० किलोमीटरच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्याची ही सातवी घटना आहे. बिबट्या आता माणसांना घाबरत नसून भरदिवसा हल्ले करत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना सध्या अक्षरशः जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

शेतीत काम करणे, बाहेर फिरणे किंवा मुलांना शाळेत पाठवणेही धोक्याचे झाले आहे. या जीवघेण्या परिस्थितीमुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. त्यामुळे, या नरभक्षक किंवा हिंस्त्र झालेल्या बिबट्याचा त्वरित शोध घेऊन त्याला पकडावे किंवा त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे केली जात आहे. बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news