आशिष देशमुख
पुणे: वेरूळ येथे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मावरील सुंदर शिल्प कोरलेल्या लेणी आजही भग्नावस्थेत दिसतात. ते तुटलेले भाग डिजिटल माध्यमाचा वापर करून या लेणीवर अत्यंत सुंदर असे शिल्प गाईड पुस्तकरूपाने प्रथमच मराठीत तयार झाले आहे.
त्यामुळे येथील शिल्पे जणू 1300 वर्षांनंतर पुन्हा बोलू लागली, असेच वाटते. पण, ही जागतिक वारसा लाभलेली मूळ शिल्पे कशी होती, हे तेराशे वर्षांनंतर हुबेहूब चितारण्याचा प्रयत्न पुण्यातील रवींद्र बोरावके या वृद्ध अभियंत्याने केला आहे.
रवींद्र बोरावके (वय 65) हे पुण्यातील मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांना नवीन काही शिकण्याची आवड असल्याने त्यांनी बी. ए. (इकोनॉमिक्स) केले. त्यानंतर ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तून ‘इंडोलॉजी’ (भारतीय विद्या) विषयात एम. ए.ची पदवी घेतली. पुरातन मंदिरातील भग्न मूर्ती पाहताना त्यांना वाटायचे की, या निर्माण केल्या तेव्हा कशा असाव्यात?
आधुनिक डिजिटायझेशन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण हे काम करू शकतो. तो प्रयोग त्यांनी पुण्यातील मंदिरातील मूर्तीवर केला. नंतरच हा प्रयोग वेरूळ लेणीवर केला. यासाठी इन्फोसिस संस्थेनेही मोठी मदत केली. या अनोख्या प्रयोगाची प्रत भांडारकर संस्थेने पंतप्रधान कार्यालयाकडेही दिली. त्याचे देशभर कौतुक होते आहे.
अशी सुचली कल्पना
बोरावके यांनी सांगतिले की, वेरूळविषयी अनेक ग्रंथ आणि छायाचित्रे मुद्रित स्वरूपात तसेच विविध माध्यमांत उपलब्ध असली तरीही अद्याप असे कोणतेही मूळ रेखाचित्र किंवा छायाचित्र नाही.
आज उपलब्ध असलेली बहुतेक चित्रे ‘सद्यःस्थिती’ दर्शवतात म्हणजेच वेरूळच्या कलेची सध्याची जीर्ण झालेली अवस्था; जी परकीय आक्रमण, काळाचा ओघ, मानवी दुर्लक्ष आणि बेपर्वाईने वागणाऱ्या पर्यटकांमुळे प्रभावित झाली आहे.
वेरूळची कला इतिहासाच्या पटलावरून हळूहळू पुसली जाईल. त्यामुळे मी कैलास लेणीतील हत्तीच्या मूळ मूर्तीची नव्याने कल्पना करून तिची प्रतिकृती 30 डिसेंबर 2016 रोजी साकारली.
मी माझी ही कलाकृती पुणे येथील ‘डेक्कन कॉलेज’चे तत्कालीन कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्यासमोर सादर केली.
हे काम 2018 मध्ये सुरू झाले. पहिल्या भागात 70 शिल्पांचे ड्राइंग अन् थोडक्यात माहिती आहे. अजून काम सुरूच असून, एकूण 3 भागांत हे गाईड विभागले आहे.