Rat menace municipal action Pune: पुण्यात उंदरांचा वाढता उपद्रव Pudhari
पुणे

Rat menace municipal action Pune: पुण्यात उंदरांचा वाढता उपद्रव; महापालिकेने मोहीम हाती घेतली, नवे पिंजरे खरेदी

शहरातील पेठांमध्ये उंदरांची संख्या वाढली; दरमहा 300 हून अधिक उंदीर पकडले जात असल्याची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शहरातील उंदरांची वाढती ‌‘संख्या‌’ आता महापालिकेच्या रडारवर आली आहे. पावसाळ्यात उंदरांच्या उपद्रवात वाढ होत असल्याने महापालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाने बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे. उंदीर पकडण्यासाठी एक लाख रुपयांचे पिंजरे खरेदी करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने 58 नवे पिंजरे खरेदी केले असून, 60 जुने पिंजरे वापरले जात आहेत. पिंजऱ्यांच्या साहाय्याने दरमहा 300 ते 350 जिवंत उंदीर पकडले जात आहेत.(Latest Pune News)

शहरात दाट लोकवस्ती तसेच पेठांमध्ये उंदरांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दर महिन्याला नागरिकांकडून 20 ते 25 तक्रारी प्राप्त होतात. प्रादुर्भाव वाढलेल्या परिसरामध्ये दोन कर्मचारी पिंजरा लावतात. दोन-तीन दिवसांनी उंदीर पकडले गेल्यावर त्यांची विल्हेवाट लावली जाते.

महापालिकेतर्फे खरेदी केले जात असलेल्या एका पिंजऱ्याची किंमत सुमारे 1,800 ते 1,900 रुपये आहे. ‌‘रॉड टाईप वायर‌’ असलेले पिंजरे अधिक टिकाऊ व परिणामकारक ठरत असल्याने त्यांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. हे पिंजरे शहरातील गल्लीबोळ, बाजारपेठा, हॉटेल परिसर आणि नाले आदींजवळ उभारले जातात.

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंजरे, ब्लॉक, विषारी गोळ्यांचे वाटप अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या तीन महिन्यांत नागरिकांकडून 50 ते 75 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार उंदीर पकडण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे. ही मोहीम नागरिकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. घरांभोवती कचरा साचू देऊ नका, अन्नकचरा उघड्यावर टाकू नका. पिंजरे किंवा गोळ्या हव्या असल्यास गाडीखान्यात संपर्क साधा.
डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी

कुठे जास्त, कुठे कमी

महापालिकेच्या माहितीनुसार, जुन्या पुण्यातील नदीच्या वरच्या गावठाण भागात आणि खालच्या पट्‌‍ट्यात उंदरांचा उपद्रव अधिक आहे. पेठ क्षेत्रात तुलनेने पूर्वी कमी उंदीर असत. मात्र, दाट लोकवस्तीमुळे पेठ भागामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हॉटेल, घर, गटार, गोदाम, नाला, शाळा आणि अगदी रुग्णालयांच्या तळमजल्यातही त्यांचा वावर दिसतो.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‌‘ब्लॉक‌’चा वापर

उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित ठिकाणी ब्लॉक ठेवले जातात. साधारणपणे 1 किलो विषारी खाद्यामध्ये 50 ब्लॉक तयार होतात. यासाठी 110 किलो विषारी खाद्य खरेदी करण्यात आले आहेत. यासाठी 1,800 रुपये प्रतिकिलो इतका खर्च होतो. ब्लॉक खाल्ल्यावर उंदरांच्या शरीरात विष शिरले की त्यांचा प्रादुर्भाव रोखता येतो. या ब्लॉकचा वापर गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर कमला नेहरू रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आला होता.

गोळ्यांचे वाटप

शहरातील नागरिकांकडून दरमहा 15 ते 25 तक्रारी महापालिकेकडे येतात. त्या ठिकाणी दोन ते तीन कर्मचारी तत्काळ जाऊन पिंजरे बसवतात किंवा गोळ्या ठेवतात. गाडीखान्यातून नागरिकांना मोफत उंदीर मारण्याच्या गोळ्याही दिल्या जातात. या गोळ्या बनविण्यासाठी दोन ते तीन महिला सेविका काम करतात. महापालिकेच्या गाडीखाना विभागात दरमहा 7 ते 10 हजार विषारी गोळ्या तयार होतात.

विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटरचा वापर

उंदीर पकडल्यानंतर त्यांना पाण्यात बुडवून मारले जाते आणि नंतर पुरून टाकले जाते. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या इन्सिनरेटरचा वापर उंदीर मारण्यासाठी करता येईल का, याबाबत सध्या प्रस्ताव विचाराधीन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT