

पुणे : देशातील प्रीमियम रेल्वेसेवा असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकडून सातत्याने होत असलेल्या कचऱ्यामुळे पुणे रेल्वे विभाग प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. अनेक प्रवासी रेल्वेने दिलेल्या नियमांचे पालन न करता कचरा डस्टबिनमध्ये न टाकता कोचमध्येच फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. रेल्वे नियमानुसार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कचरा करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. सोमवारी यासंदर्भात नवीन सूचना जारी केल्या.(Latest Pune News)
प्रवाशांनी प्रवासादरम्यान निर्माण होणारा सर्व कचरा, मग तो खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे असोत वा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, तो रेल्वेतील कचराकुंडीतच टाकला जावा. कोचच्या फ्लोअरवर किंवा आसनांखाली कचरा टाकू नये. विमानाप्रमाणेच, आता वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी ठरावीक वेळेनंतर कोचमधून फिरतील. प्रवाशांनी त्यांच्याकडे आपला कचरा देऊन सहकार्य करावे. लहान मुलांकडून अनवधानाने कचरा होऊ नये, यासाठी पालकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, वंदे भारत ही देशाची प्रतिष्ठा आहे. तिची स्वच्छता राखणे ही प्रत्येक प्रवाशाची नैतिक जबाबदारी आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसची प्रीमियम सेवा आणि सुविधा प्रवाशांना आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव देण्यासाठी आहे. त्यामुळे या ट्रेनमध्ये अस्वच्छता पसरविणे हे नियमांचे उल्लंघन असून, वारंवार अशा प्रकारे कचरा करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे नियमांनुसार योग्य ती कारवाई केली जाऊ शकते. प्रवाशांनी या सूचनांचे गांभीर्याने पालन करून वंदे भारत एक्स्प्रेसला देशातील सर्वांत स्वच्छ आणि सुंदर रेल्वे म्हणून कायम ठेवण्यास मदत करावी.
हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग
सोमवारी कोल्हापूर ते पुणे वंदे भारत रेल्वेने प्रवास केला. रेल्वेने दिलेली ही सुविधा खूप सुंदर आहे. मात्र, इतर प्रवासी यामध्ये कचरा करीत आहेत. खास करून सीट खाली कचरा असल्याचे प्रवासादरम्यान दिसले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी आणि वंदे भारत स्वच्छ ठेवावी. यासोबतच कोल्हापूर वंदे भारत रेल्वे प्रवासाचा कालावधी आणखी कमी कसा होईल, यासाठीही पुणे रेल्वे विभागाने प्रयत्न करावेत.
एक प्रवासी