पुणे

Rajgurunagar Crime : पतीला दूध आणायला पाठवलं अन्..., भोंदूबाबाची कृत्ये महिला भक्तांनीच आणली चव्हाट्यावर

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, परिसरात उसळली संतापाची लाट

पुढारी वृत्तसेवा

खेड : खेड तालुक्यातील चांडोली येथील शिवदत्त आश्रमात भक्तीच्या नावाखाली आश्रमात आलेल्या महिलांशी विनयभंग करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश झाला आहे. नवनाथ पंढरीनाथ गवळी (वय ५३) असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे. एका ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करत या बाबाच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी गवळीवर भादंवि कलम ३५३, नवीन कलम ७४ आणि ७५(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला तशी नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली. गुन्ह्याच्या तपासातून असे समोर आले आहे की, गवळीने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन-तीन महिलांनी याबाबत पुढे येऊन तक्रार केल्याचे समजते.

दीड वर्षांपूर्वी गवळीने राजगुरुनगरातील गढई मैदान परिसरात दत्तभक्त असल्याचा दावा करत आपले दुकान थाटले. शहरातील काही भक्तांनी चांडोली येथे स्वखर्चाने जागा घेऊन त्याच्यासाठी ‘शिवदत्त’ नावाचा आश्रम उभारला. या आश्रमात एक ३५ वर्षीय महिला आपल्या पतीसह नियमित दर्शनासाठी येत होती. जप करताना गवळीने तिचा विनयभंग केला. १७ जुलै रोजी पहाटे ही महिला पतीसह आश्रमात गेली असता, गवळीने पतीला दूध आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले आणि महिलेशी गैरवर्तन केले.

दरम्यान, त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा आश्रमात आल्यानंतर गवळीने पतीला पुढे जाण्यास सांगून महिलेचा हात पकडत शारीरिक सुखाची मागणी केली. महिलेने यावेळी पतीकडे धाव घेत घरी परतण्याचा निर्णय घेतला. घाबरलेल्या पीडितेने भीतीपोटी पतीला किंवा घरी कुणाला कल्पना दिली नाही. मात्र आश्रमात जाणे बंद केले. त्यानंतर बाबाने तिला वारंवार मोबाईलवर संपर्क साधून ‘तुझ्या अंगात कालीमाता आहे, ती काढण्यासाठी होमहवन करावे लागेल,’ असे सांगून त्रास द्यायला सुरू केले. अखेर, महिलेने आपल्या पती, कुटुंबीय आणि जवळच्या मैत्रिणींशी चर्चा करून खेड पोलिसांत तक्रार दाखल केली.

गवळी हा मूळ परभणी येथील आहे. तिथेही असाच प्रकार घडल्यानंतर त्याने पलायन केले आणि राजगुरुनगरात येऊन आपले कारनामे सुरू केले. याप्रकरणी खेड पोलिस पुढील तपास करत असून, आणखी काही महिलांनी तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. खेड पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, गवळीच्या इतर संभाव्य बळींचा शोध घेत आहेत.

खेड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकू नये आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तीच्या बाबतीत तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, भक्तीच्या नावाखाली होणाऱ्या अशा कृत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT