

टाकळी भीमा: गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर परिसरात खासगी सावकारांचा उच्छाद वाढला आहे. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आणि शेतकरी नागरिकांना सावकारांनी वेठीस धरल्याचे दिसत आहे.
सावकार मंडळी कर्जदारांना मासिक 10 ते 12 टक्के व्याजाची आकारणी करून त्यांची अक्षरशः पिळवणूक करीत असल्याचे बोलले जात आहे. दबावामुळे तक्रार दाखल होत नाही. परंतु, याविषयी अनेकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (Latest Pune News)
पंचक्रोशीत अनेक पतसंस्था आणि दहा-बारा बँका आहेत. पण, गोरगरीब लोकांना या बँका पतसंस्थांचे दरवाजे जणू काही बंदच असतात. कर्जासाठी या बँका पतसंस्थांना लागणारी कागदपत्रे व अन्य बाबींची पूर्तता करणे सर्वसामान्यांना सहजासहजी शक्य होत नाही. ही गोष्ट हेरून परिसरातील काही जणांनी गेल्या काही महिनाभरापासून खासगी सावकारी करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.
पतसंस्था सहजासहजी मदतीचा हात देत नसल्याने छोटे व्यावसायिक आणि प्रामुख्याने शेतकरी वर्गाला छोट्या-मोठ्या अडचणींच्या वेळी खासगी सावकारांपुढे हात पसरण्याशिवाय पर्याय राहत नाही. एकदा का एखादा कर्जदार या सावकाराच्या जाळ्यात अडकला की त्याची सुटका होणे जवळजवळ अशक्य होते.
भाजीविक्रेते, छोटे-मोठे दुकानदारांपैकी अनेक जण खासगी सावकारांच्या कचाट्यात अडकलेले असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येते. सावकार मंडळी या लोकांची गरज बघून कधी 10 टक्के, तर कधी 12 ते 15 टक्क्यांनी व्याजाची आकारणी करतात. या व्यावसायिकांचा होणारा सगळा नफा सावकारांचे व्याज आणि देणी भागविण्यात जात असल्याने अनेक व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. व्यवसाय आपल्यासाठी करायचा की सावकारांसाठी? अशी यांची अवस्था झाली आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत मजुरी करणार्या मजूरवर्गाचे प्रमाण मोठे आहे. मजूर, शेतकरीवर्गही सावकारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे. दिवसरात्र काबाडकष्ट करून सावकारांची देणी भागविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मजुरांच्या हाताला फारसे काम नाही.
त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी या लोकांना सावकारांपुढे हात पसरावे लागतात. अनेक सावकार संघटित असून, आपल्या पैशाच्या वसुलीसाठी एकमेकांना मदत करताना दिसतात. वसुलीसाठी अनेकदा त्यांची सुरू असलेली दादागिरी पाहायला मिळते. वसुलीसाठी कर्जदाराला दमबाजी करणे, मारहाण करणे. त्यामुळे याविषयी आवाज उठवून सावकारकीला पायबंद करण्याची मागणी होत आहे.